मुंबई : आर्थिक घोटाळा करणाऱ्या कंपन्यांवरील कारवाईची मोहीम सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अधिक तीव्र केली असून, शुक्रवारी दिवसभरात दोन स्वतंत्र कारवायांच्या माध्यमातून १०१ कोटी ५५ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली. ही दोन्ही प्रकरणे मनी लाँड्रिंगची आहेत.
उपलब्ध माहितीनुसार झारखंडमधील साहिबगंज जंगलात सुरू असलेल्या अवैध खाण प्रकल्पावर ईडीने छापे टाकले. हा प्रकल्प झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा निकटवर्तीय असलेल्या पंकज मिश्राचा असल्याचे समजते. या जंगल परिसरात कंपनीशी संबंधित नऊ ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकत पाच स्टोन क्रशर मशीन आणि सुरुंगासाठी लागणारे काही सामान जप्त केले.
या दोन्ही सामुग्रीसाठी कंपनीकडे कोणतीही परवानगी नव्हती, असा दावा ईडीने केला आहे. तसेच या छाप्यात कंपनीच्या ३७ बँक खात्यांत असलेली ११ कोटी ८८ लाख रुपयांची रक्कमही ईडीने जप्त केली. यापूर्वी मे महिन्यातही कंपनीशी संबंधित ३६ ठिकाणी ईडीने छापे टाकले होते. त्यापैकी एक छापा हा सध्या अटकेत असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी पूजा सिंघल यांच्याशी निगडित मालमत्तेवर टाकण्यात आला होता. शुक्रवारच्या कारवाईनंतर आतापर्यंत ईडीने कंपनीची एकूण ३६ कोटी ५८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.कंपनी समूहाकडून रेल्वेची फसवणूक
- अन्य घटनेत भारतीय रेल्वेमार्फत आपल्या मालाची वाहतूक करताना चुकीची माहिती देत सरकारी खजिन्याचे ७३ कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी पश्चिम बंगालस्थित रश्मी ग्रूप ऑफ कंपनीच्या कार्यालयावर छापे टाकले.
- कंपनीशी संबंधित तीन ठिकाणी छापे टाकत ईडीने कंपनीच्या बँक खात्यात असलेली ६४ कोटी ९७ लाख रुपयांची रक्कम जप्त केली.
- कंपनीच्या कार्यालयातून एक कोटी रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली. सिमेंट आणि धातू क्षेत्रात कार्यरत असलेल्या या कंपनीने रेल्वेद्वारे माल वाहतूक करताना चुकीची माहिती दिली.
- ज्या मालाकरिता रेल्वेतर्फे कमी शुल्क आकारले जाते, अशा मालश्रेणीत आपल्या मालाची नोंद कंपनीने केली. वास्तविक कंपनीच्या मालासाठी त्यापेक्षा अधिक दर आकारणी लागू होती.
- अशा पद्धतीने रेल्वेची फसवणूक करत कंपनीने सरकारी महसुलाचे ७३ कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेने एफआयआर दाखल केला होता.