ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - लोकसभा निवडणूकीला येत्या मे महिन्यात दोन वर्ष होत आली असतानाही विद्यमान लोकसभेतील १०५ खासदारांनी आपली संपत्ती जाहीर केली नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये समाजवादी पक्षाचे ५ तर आम आदमी पक्षाचे सर्व ४ खासदारांचा समावेश आहे. तर सध्या सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षातील अवघ्या दोन खासदारांनी अद्याप आपल्या संपत्तीची माहिती उघड केलेली नाही. ' दि इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तपत्र समूहाने माहिती अधिकाराअंतर्गत विचालेल्या प्रश्नांतून ही माहिती समोर आली आहे.
लोकसभेच्या नियमप्रमाणे, संसदेचा सदस्य म्हणून शपथ घेतल्यापासून ९० दिवसांच्या आत प्रत्येक सदस्याला आपली संपत्ती व मालमत्ता जाहीर करावी लागते. याप्रकरणी लोकसभा सचिवालयातून वारंवार विचारणा करूनही अद्याप १९ टक्के खासदारांनी संपत्तीची माहिती जाहीर केलेली नाही.
काँग्रेसच्या ४५ खासदारांपैकी १४ खासदारांनी तर तृणमूल काँग्रेसच्या ३४ पैकी ८ खासदारांनी संपत्ती जाहीर केलेली नाही. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील तेलगू देसम पक्षाच्या १६ पैकी १० खासदारांनी आणि सत्ताधारी भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या १८ पैकी ९ खासदारांनीही आपल्या मालमत्तेची माहिती या २ वर्षांत जाहीर केलेली नाही.
विशेष बाब म्हणजे संपत्ती जाहीर न करणा-यांच्या यादीत समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव, त्यांची सून डिंपल यादव, तसेच धर्मेंद्र यादव, अक्षय यादव आणि तेजप्रतापसिंग यादव या पाच जणांचाही समावेश आहे. तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील दिलीपकुमार मनसुखलाल गांधी आणि रविंद्र कुमार राय या दोघांनीही अद्याप संपत्ती जाहीर केलेली नाही.