दिल्ली - सर्व शिक्षा अभियान हे देशभरात व्हायरल झालेल्या शिक्षणाच्या टॅगलाइनला विशेष महत्व आहे. शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही वयाचं बंधन नसतं. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही शिक्षण घेऊ शकता. याचचं उदाहरण पाहायला मिळालं आहे केरळच्या भागीरथी अम्मा यांच्याकडे पाहून. लहानपणापासून शिक्षणाची गोडी असणाऱ्या भागीरथी यांनी वयाच्या १०५ व्या वर्षी आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे.
केरळमध्ये राज्य साक्षरता अभियानद्वारे चौथी वर्गाच्या परीक्षेत भागीरथी यांनी सहभाग घेतला होता. माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितले की, मी नेहमी शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहत होती. मात्र लहानपणी आईचा मृत्यू झाला, त्यानंतर घरातील भावंडाची जबाबदारी माझ्यावर आली त्यामुळे माझं स्वप्न अपूर्ण राहिलं.
या कठीण संघर्षातून उभं राहतात भागीरथी यांनी घर संसार सांभाळलं मात्र दुर्दैवाने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. वयाच्या ३० व्या वर्षी भागीरथी यांच्या पतीचा मृत्यू झाला. घरातील मुलाबाळांचा सांभाळ करणं त्यांच्यासमोर आव्हान बनलं होतं. आयुष्यातील या संघर्षमय प्रवासात शिक्षणापासून त्यांना लांब राहावं लागलं. मात्र उतारवयात त्यांना पूर्ण अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली. भागीरथी यांनी चौथीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांची ही जिद्द इतरांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार साक्षरता मिशनचे निर्देशक पीएस श्रीकला यांनी सांगितले की, भागीरथी आम्मा या केरळ साक्षरता अभियानातील आतापर्यंतच्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहे जे शिक्षण घेत आहेत. भागीरथी आम्मा यांना लिहिण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. मात्र त्यांच्या मुलीने यासाठी त्यांना मदत केली. पर्यावरण, गणित आणि मल्ल्याळम असे पेपर त्यांनी दिले.
भागीरथी आम्मा यांना परीक्षा देताना अतिशय आनंद झाला. वयाच्या ९ व्या वर्षी भागीरथी आम्मा यांनी तिसरीत असताना शिक्षण सोडलं. इतक्या मेहनतीने शिक्षण घेत असलेल्या भागीरथी आम्माकडे आधारकार्ड नाही त्यामुळे त्यांना विधवा पेन्शन अथवा ज्येष्ठ नागरिक पेन्शनही मिळत नाही. मागच्या वर्षी ९६ वर्षाच्या कार्तियानी आम्मा यांनी साक्षरता अभियानात सर्वात जास्त मार्क मिळविले होते. त्यांना १०० पैकी ९८ गुण मिळाले होते.