नवी दिल्ली : रेल्वेच्या आरक्षित डब्यांमधील बर्थवर प्रवाशांनी झोपण्याच्या वेळेत रेल्वेने एक तासाने कपात केली असून त्यानुसार आता रात्री १० ते स. ६ या वेळातच बर्थ झोपण्यासाठी उपलब्ध असेल.आधी झोपण्यासाठी बर्थची वेळ रा. ९ ते स. ६ अशी होती. रेल्वेने आता नवे परिपत्रक काढून झोपण्याची वेळ एक तासाने पुढे नेली आहे. या वेळेखेरीज इतर वेळी प्रवाशांनी बर्थवर न झोपता आपापल्या आरक्षित आसनांवर बसून प्रवास करावा, असे रेल्वेने म्हटले आहे.मात्र आजारी व अपंग प्रवासी तसेच गरोदर महिला प्रवासी यांना इतर प्रवाशांनी सहकार्य करावे आणि त्यांना या ठरलेल्या वेळेखेरीज इतर वेळी बर्थवर झोपायचे असेल तर झोपू द्यावे, असे आवाहनही रेल्वेने केले आहे. काही प्रवासी गाडी सुरू झाली की लगेच बर्थवर पथारी पसरतात. काही जण संपूर्ण प्रवासभर झोपून राहतात. प्रवासी बर्थ टाकून लवकर झोपला किंवा सकाळी लवकर उठला नाही तर खालच्या बर्थवर प्रवाशांना मान आखडून बसावे लागते. खास करून साईड अपर बर्थच्या बाबतीत ही अडचण जाणवते होती.>वेळी-अवेळी बर्थ टाकून झोपल्यामुळे इतर प्रवाशांना बसायला जागा मिळत नाही किंवा मान आखडून बसावे लागते. यावरून प्रवाशांमध्ये भांडणे होतात. गाडीतील कर्मचा-यांकडून ही माहिती मिळाल्याने बर्थवर झोपण्याच्या वेळेत हा बदल केला गेला आहे.टीटीईलाही सोयीचेमुळात रेल्वेत आरक्षित बर्थवर झोपण्याची काही निश्चित वेळ ठरलेली असते, याचीच अनेक प्रवाशांना कल्पना नसते. आरक्षण तिकिटावरही तशी कुठे तळटीप नसते. परंतु रेल्वेच्या कमर्शियल मॅन्युअलच्या पहिल्या खंडात परिच्छेद क्र. ६५२ मध्ये तशी तरतूद आहे. आता त्यातच दुरुस्ती करून बर्थवर झोपण्याची ही नवी वेळ त्यात घालण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांमध्यो होणारी भांडणे सोडविणेही गाडीतील टीटीईला सोपे जाईल.
रात्री १० ते स. ६ पर्यंतच झोपायला रेल्वेचा बर्थ, प्रवाशांनी झोपण्याच्या वेळेत रेल्वेने एक तासाने केली कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 6:43 AM