बाडमेर : टाकाऊ वस्तूंपासून (स्क्रॅप स्कल्चर) एटीएम मशीन तयार केल्यामुळे राजस्थानमधील एक दहावीचा विद्यार्थी सध्या चर्चेत आहे. राजस्थानच्या बारमेर येथील दहावीच्या विद्यार्थ्याने टाकाऊ वस्तूंपासून एटीएम बनवले आहे. भरत जोगल असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
सरकारी शाळेत शिकणाऱ्या भरत जोगलचे कौशल्य त्याच्या प्रोजेक्टमध्ये स्पष्टपणे दिसून येते. ज्या गावात एटीएम नाही, ज्या मुलाने कधीही एटीएम वापरला नाही, त्या मुलाने एटीएम तयार करून ग्रामीण भागात भरपूर कौशल्य असल्याचे स्पष्ट केले, पण योग्य दिशा मिळण्यास उशीर झाल्याचे दिसून येते.
भरतचे वडील मजुरीचे काम करतात. घरची परिस्थितीही फारशी चांगली नाही. अशा परिस्थितीत भरतला शाळेतून काहीतरी बनवण्याचा प्रोजेक्ट मिळाला. सायन्सचा विद्यार्थी असलेल्या भरतने विचार केला की, घरातील टाकावू वस्तूंपासून काहीतरी वेगळे बनवायचे. यानंतर त्याच्याकडून एटीएम बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली.
भरतने हे एटीएम मशीन केंद्र सरकारच्या इन्स्पायर अवॉर्ड स्टँडर्ड योजनेअंतर्गत तयार केले आहे. भरतच्या एटीएमची प्रथम राज्यासाठी आणि आता राष्ट्रीय स्तरासाठी निवड झाली आहे. घरातील टाकाऊ वस्तूंपासून एटीएम तयार करण्यात आल्याचे स्वत: भरत सांगतो.
यामध्ये वायर, कागद, मोटार, रबर, झाकण आणि टाकाऊ साहित्य वापरून एटीएम मशीन बनवण्यात आले आहे. ते बनवण्यासाठी 10 दिवस लागले. भरतने टाकाऊ वस्तूंपासून बनवलेले एटीएम मूळ मशीनप्रमाणे काम करते. यामध्ये तुम्ही एटीएममध्ये कार्ड टाकताच तो तुम्हाला पिन विचारेल.
तुम्ही पिन नंबर टाकला की तुम्हाला किती पैसे काढायचे आहेत, ते टाईप करावे लागेल. त्यानंतर एटीएममधून नोटा बाहेर येण्यास सुरूवात होईल. विशेष म्हणजे, या एटीएममध्ये भरतने नोटासोबत नाण्यांची तरतूद ठेवली आहे, जसे की एटीएममध्ये कोणी 110 रुपये काढले तर त्याला 100 रुपयांची एक नोट आणि 10 रुपयांचे एक नाणे मिळेल.