नवी दिल्ली - भारतातील 11 मुख्यमंत्र्यांच्या विरोधात गुन्हेगारी खटले सुरु आहेत. याबाबत असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारतातील 29 राज्य आणि दोन केंद्रशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार एडीआरनं हा अहवाल सादर केला आहे. 31 पैकी 11 मुख्यमंत्र्यांच्यावर गुन्हेगारी खटले सुरु आहेत. त्यापैकी 8 जणांविरोधात गंभीर गुन्हेगारी खटल्यांची नोंद आहे. एडीआरच्या या अहवालामध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात सुरु असलेल्या सर्व खटल्यांची माहिती देण्यात आली आहे.
एडीआरच्या अहवालानुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यार सर्वाधिक 22 खटल्यांची नोंद आहे. आमचा कारभार पारदर्शक असणार असे म्हणणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुन्हेगारी खटल्यांची नोंद असलेल्यांमध्ये आघाडीवर आहेत. फडणवीस यांच्याविरोधात काही गंभीर गुन्हेगारी खटल्यांची नोंद आहे. यामध्ये तीन गंभीर गुन्हेगारी खटल्यांची नोंद त्यांच्यावर आहे. यामध्ये वाहनाची तोडफोड, दंगा करणे यासारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. या अहवालात सर्वात कमी गुन्हेगारी खटल्यांची नोंद बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि जम्मू कश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्यानावावर आहे. यांच्या नावावर प्रत्येकी एका खटल्याची नोंद आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर 11 तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विरोधात 10 गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले आहे.
मुख्यमंत्र्यांची नावं
- देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र, भाजपा : 22 केस
- पिनराई विजयन, केरळ, CPI (M): 11 केस
- अरविंद केजरीवाल, दिल्ली, आप : 10 केस
- रघुवर दास, झारखंड, भाजपा : 8 केस
- कॅप्टन अमरिंदर सिंह, पंजाब, काँग्रेस : 4 केस
- योगी आदित्यनाथ, उत्तरप्रदेश, भाजपा : 4 केस
- चंद्रबाबू नायडू, आंध्रप्रदेश, TDP: 3 केस
- के चंद्रशेखर राव, तेलंगणा, TRS: 2 केस
- वी नारायणसामी, पुदुचेरी, काँग्रेस: 2 केस
- महबूबा मुफ्ती, जम्मूकाश्मीर, PDP: 1 केस
- नीतीश कुमार, बिहार, JD (U): 1 केस
असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या अहवालात सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांचीही माहिती देण्यात आली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. नायडू यांच्याकडे 177 कोटींची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. तर दुसऱ्या स्थानावर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आहेत. त्यांच्याकडे 129 कोटी ची संपत्ती आहे. तिसऱ्या स्थानावर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आहेत. अमरिंदर सिंग यांच्याकडे 48 कोटींची संपत्ती आहे. एडीआरच्या अहवालानुसार शिक्षणाच्या बाबतीत सिक्कीमचे मुख्यमंत्री पी. के. चामलिंग हे आघाडीवर आहेत. चामलिंग यांच्याकडे पीएचडी आहे. देशातील 39 टक्के मुख्यमंत्री पदवीधारक असून, 32 टक्के मुख्यमंत्र्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. ज्यांनी माध्यमिक शिक्षणही पूर्ण केले नाही असे प्रमाण 10टक्के आहे.