विजयवाडा : आंध्र प्रदेशमधील विजयवाडा शहरामध्ये कोरोना उपचार केंद्रात रुपांतरित केलेल्या एका हॉटेलला रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत ११ जण होरपळून मरण पावले. ५० कोरोना रुग्णांवर या हॉटेलमधील केंद्रात उपचार सुरू होते. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येते.अहमदाबाद येथे गुरुवारी पहाटे श्रेय रुग्णालयाला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत आठ कोरोना रुग्ण मरण पावले होते. त्यानंतर तीनच दिवसांनी तशीच घटना विजयवाडा येथेही घडली आहे. विजयवाडातील इलूरू मार्गावर असलेले स्वर्ण हॉटेलचे कोरोना उपचार केंद्रात रुपांतर करण्यात आले आहे. तिथे गेल्या दोन आठवड्यांपासून ५० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते.या दुर्घटनेत आग लागल्यानंतर धुरामुळे गुदमरून काही जणांचा मृत्यू झाला आहे. इथे उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांपैकी काही जणांना श्वसनास आधीपासूनच त्रास होत होता. त्यात अशी स्थिती उद्भवल्याने त्यांची अवस्था अधिकच गंभीर झाली व त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजयवाडा येथे लागलेल्या आगीत ११ जण मरण पावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच दुर्घटनाग्रस्तांना शक्य ती सर्व मदत करण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे. विजयवाडाचे पोलीस आयुक्त बी. श्रीनिवासुलू यांनी सांगितले की, स्वर्ण हॉटेलच्या तळमजल्याला सर्वप्रथम आग लागली. घटनेचे वृत्त कळताच, बचावपथके काही वेळातच स्वर्ण हॉटेलला पोहोचली व त्यानंतर अर्ध्या-पाऊण तासात ही आग विझविण्यात आली.चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेशआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी विजयवाडामधील आगीच्या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनाग्रस्तांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.या घटनेची चौकशी होणार असून त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना लवकरात लवकर सादर केला जाईल. विजयवाडातील आग दुर्घटनेतील जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.
CoronaVirus News: कोरोना केंद्राला लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू; शॉर्टसर्किटमुळे घडली दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 3:42 AM