मुंबई: गेल्या वर्षी झालेल्या कॉमन ऍडमिशन टेस्टचा (कॅट) निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं. परीक्षेतील 11 टॉपर्सपैकी 7 विद्यार्थी महाराष्ट्राचे आहेत. या परीक्षेत एकूण 2 लाख विद्यार्थ्यांनी यश मिळवलं. पर्सेंटाईल गुणांचा विचार केल्यास 11 विद्यार्थ्यांना 100 टक्के मिळाले आहेत. हे सर्व अभियांत्रिकी विभागाचे विद्यार्थी आहेत. मात्र यात एकाही विद्यार्थिनीचा समावेश नाही. कॅट 2018 मध्ये 100 पर्सेंटाईल गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 11 इतकी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर तब्बल 21 विद्यार्थी आहेत. त्यांना 99.99 टक्के गुण मिळाले आहेत. यातील 19 विद्यार्थी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेचे आहेत. आयआयएम कोलकातानं ही आकडेवारी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून जाहीर केली आहे. अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी बिझनेस स्कूलकडे वळत असल्याचं यातून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. 25 नोव्हेंबर 2018 रोजी कॅट परीक्षा झाली होती. दोन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. देशातील 147 शहरांमध्ये दोन सत्रांमध्ये ही परीक्षा झाली होती. यामध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. देशातील एकूण 11 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल गुण मिळवण्यात यश आलं. यातले 7 विद्यार्थी एकट्या महाराष्ट्रातले आहेत. ठाण्याच्या रौनक मुजूमदारनं 100 टक्के गुण मिळवले. रौनक आयआयटी कानपूरचा विद्यार्थी आहे. पश्चिम बंगालच्या दोन, कर्नाटक आणि बिहारच्या प्रत्येकी एका विद्यार्थ्याला 100 टक्के गुण मिळवता आले.
अभिमानास्पद! 'कॅट'मध्ये महाराष्ट्राचा झेंडा; टॉप 11मध्ये राज्यातील 7 जण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2019 3:34 PM