विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम बंदरातील हिंदुस्तान शिपयार्ड लि. या जहाजबांधणी गोदीत शनिवारी सकाळी चाचणी घेताना एक महाकाय क्रेन कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला. कंपनीच्या ७५ वर्षांच्या इतिहासात अशा प्रकारचा हा पहिलाच अपघात आहे. ७० टन वजनाची ही क्रेन दोन वर्षांपूर्वी मुंबईच्या अनुपम क्रेन्स या कंपनीने उभारली होती; पण तिचा वापर सुरू झाला नव्हता.
शनिवारी सकाळी वजन उचलण्याच्या क्षमतेची चाचणी घेतली जात असताना पायाकडचा भाग जमिनीपासून निखळून ती कलंडली आणि वरच्या भागात कर्मचाऱ्यांसाठी असलेले पोलादी केबिन उंचीवरून खाली कोसळले. मृतांमध्ये एचएसएलच्या चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.उर्वरित सात जण हे तीन कंत्राटदार कंपन्यांचे मजूर होते. एकूण ११ जण या प्रचंड पोलादी धुडाखाली चिरडून जागीच ठार झाले. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात येऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आलेआहेत.मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी व्ही. विनय चंद, तसेच पोलीस आयुक्त आर. के. मीणा यांच्याकडून या दुर्घटनेबाबत माहिती घेतली आणि पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले.या दुर्घटनेत मानवी निष्काळजीपणा झाला किंवा काय, याची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.12 मे रोजी विशाखापट्टणममध्ये एका कंपनीत वायुगळती होऊन १२ जण मृत्युमुखी पडले होते व अन्य अनेक जणांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मागील महिन्यातही परवाडा भागातील एका फार्मा कंपनीत आग लागून एकाचा मृत्यू झाला होता.