बांसवाड - राजस्थानच्या बांसवाड जिल्ह्यातील एका महिला शिक्षिकेचा अत्यंत दुर्दैवी अपघातीमृत्यू झाला. आपल्या स्कुटीवरुन शाळेत जात असातना 11 केव्हीची वायर तिच्या अंगावर पडल्याने या 25 वर्षीय महिला शिक्षकाला आपले प्राण गमवावे लागले. उच्च दाबाचा प्रवाह या वायरमधून वाहत असल्याने महिलेच्या अंगावर वायर पडताच तिने पेट घेतला. त्यामध्ये, जळून महिलेचा जागीच मृत्यू झाला.
बांसवाडा जिल्ह्यातील नोगामा क्षेत्रात घडलेल्या या अपघातास पाहणाऱ्या व्यक्तींच्या अंगावर शहारे आले, इतकी भीषण आणि भयावह ही घटना होती. अचानक मोठा आवाज झाला अन् तार तुटून स्कुटीवरुन प्रवास करणाऱ्या महिलेच्या अंगावर पडली. विजेचा वायरमध्ये हाय व्होल्टेज असल्याने महिलेच्या शरीराने पटे घेतला अन् महिला जागीच ठार झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
मृत झालेली महिला राजकीय उच्च प्राथमिक विद्यालयात, गणेशपुरा येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. सकाळी साधारण 10 वाजण्याच्या सुमारास या 25 वर्षीय महिला शिक्षिका शाळेसाठी जात होत्या. अचानक वातावरणात झालेल्या बदल्याने आणि वाऱ्यामुळे विजेची वायर तुटल्याने हा अपघात झाला. या दुर्घनेची दाहकता प्रचंड वेदनादायी होती. गाडीसह महिला शिक्षिकेचे शरीर जळून खाक झाले.
दरम्यान, या घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ फोन करुन वीज वितरण कार्यालयात वीज कापण्यासाठी सांगितलं होतं. मात्र वीज वितरण विभागाने तब्बल 20 मिनिटांनंतर वीजपुरवठा बंद केला. त्यामुळे, स्थानिकांनी वीज वितरण कार्यालयाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. काही महिन्यांपूर्वी याच भागात वीजेची तार तुटल्याने दोन पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत महिलेच्या वडिलांना याबाबत सांगितले. त्यानंतर, मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे वडिल रणछोड पाटीदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलीस पंचनामा आणि कार्यवाही सुरू आहे.