नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाचा रविवारी शपथविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करताना जुन्या मंत्रिमंडळातील अनुभवी चेहऱ्यांकडे पुन्हा तीच खाती सोपविण्यात आली. पूर्वीच्या मंत्रिमंडळातील एकूण ११ मंत्र्यांना पुन्हा एकदा तीच खाती देण्यात आली.
राजनाथ सिंह यांना संरक्षण, अमित शाह यांना गृह व सहकार, तर नितीन गडकरी यांच्याकडे रस्तेवाहतूक, निर्मला सीतारमण यांच्याकडे अर्थ, एस. जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार, अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे, माहिती व प्रसारण, पीयूष गोयल यांच्याकडे वाणिज्य, सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे बंदरे, धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे शिक्षण, जुएल ओराम यांना आदिवासी विकास, हरदीपसिंह पुरी यांच्याकडे पेट्रोलियम, तर किरेन रिजीजू यांच्याकडे संसदीय कार्य मंत्रालयाची जबाबदारी पुन्हा एकदा सोपविण्यात आली. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे कृषी व ग्रामविकास खात्याची, तर मनोहरलाल खट्टर यांना गृहनिर्माण, शहरविकास, ऊर्जा खाते देण्यात आले.
महाराष्ट्राकडून गेली ही महत्त्वाची खाती नरेंद्र माेदी यांच्या यापूर्वीच्या मंत्रिमंडळात असलेले चार मंत्री नव्या मंत्रिमंडळात नसल्यामुळे त्यांची खातीदेखील आता महाराष्ट्राच्या वाट्याला राहिली नाहीत. मध्यम, लघु व सूक्ष्म उद्याेग, अर्थ राज्य, रेल्वे राज्य व आराेग्य राज्य ही ती खाती हाेत.
महत्त्वाची खाती भाजपकडेचयंदा मित्रपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले असतानाही, मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती भाजपने स्वतःकडे ठेवली आहे. प्रमुख मित्रपक्ष असलेल्या टीडीपी व जदयु यांना नागरी हवाई वाहतूक, पंचायत राज, मत्सव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय ही खाती सोपविण्यात आली. जेडीएसच्या एच.डी. कुमारस्वामी यांना अवजड उद्योग व पोलाद मंत्रालय, हमच्या जीतनराम मांझी यांना सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग, लोकजनशक्ती पक्षाच्या चिराग पासवान यांना अन्नप्रक्रिया उद्योग खात्याची जबाबदारी सोपविली आहे.
शपथविधीनंतर किती तासांत खातेवाटप?मागील चार निवडणुकानंतर झालेल्या खातेवाटपासाठी लागलेला वेळ ही यंदा सर्वाधिक होती. यंदा शपथविधीनंतर २३.३० तासांनी खातेवाटप जाहीर करण्यात आले. २०१९ मध्ये शपथविधीनंतर १८ तासांनी, २०१४ मध्ये १५.३० तासांनी, तर २००९ मध्ये १५.५५ तासांनी खातेवाटप जाहीर करण्यात आले.
धाेरणे यशस्वी करणाऱ्या मंत्र्यांवर विश्वास खातेवाटपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांवरील प्रगाढ विश्वास दिसून येतो. विशेषतः सरकारची धोरणे आणि कार्यक्रम यशस्वीपणे राबविणाऱ्या प्रमुख मंत्रालयांची जबाबदारी सांभाळणाऱ्या मंत्र्यांवर त्यांनी यावेळीही विश्वास टाकला.
राज्यसभेतून पाच मंत्र्यांना संधीमोदी यांच्या मंत्रिमंडळात एकूण ३६ मंत्र्यांचा समावेश असून त्यापैकी राज्यसभेतील ५ जणांना संधी देण्यात आली. त्यात जे.पी. नड्डा, निर्मला सीतारमण, एस. जयशंकर, अश्विनी वैष्णव, हरदीप सिंह पुरी यांचा समावेश आहे.