- हरीश गुप्ता, नवी दिल्ली
खासदार स्थानिक विकास निधी (एमपीएलएडी) सध्याच्या पाच कोटी रुपयांवरून दरवर्षी दहा कोटी रुपये करण्याची मागणी मधूनमधून जोर धरत असली तरी निधी प्रत्यक्षात खर्च करण्याची वेळ येते तेव्हा मात्र अतिशय दारुण चित्र समोर येते. लोकमतने आढावा घेतला असता १६ व्या लोकसभेत महाराष्ट्रातील ४८ पैकी किमान ११ मतदारसंघात तर एकही पैसा खर्च झालेला नाही, हे भीषण वास्तव समोर आले. खर्च न करणाऱ्यांमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि अन्य पक्षांच्या खासदारांचाही समावेश आहे.राज्यातील प्रत्येक खासदार दरवर्षी पाच कोटी याप्रमाणे दोन वर्षात ४८० कोटींच्या निधीसाठी पात्र ठरले आहेत. खासदारांची उदासीनता बघता सरकारने केवळ २०५ कोटी रुपये जारी केले आहेत. त्यातील केवळ ५५ कोटी रुपये पहिल्या १५ महिन्यांत खर्ची पडले. विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जनहिताचे मुद्दे लावून धरण्यासाठी प्रसिद्ध असलेले खा. किरीट सोमय्या, प्रीतम गोपीनाथ मुंडे यांनी या काळात एकही पैसा खर्च केलेला नाही. सोमय्या यांनी ४.३७ कोटी रुपयांच्या योजनेची शिफारस केली, त्यासाठी पैसाही मंजूर झाला मात्र अद्याप पैसा खर्च झालेला नाही. काँग्रेसचा युवा चेहरा राजीव सातव यांच्यासह नानाभाऊ पटोले, प्रतापराव गणपतराव जाधव, सुभाष भामरे, चिंतामण वानंगा, रवींद्र विश्वनाथ गायकवाड, संजय हरिभाऊ जाधव, अनिल शिरोळे, संजय पाटील आदींनीही निधी उपयोगात आणलेला नाही. सरासरीतही महाराष्ट्र मागेमहाराष्ट्रातील खासदार दोन वर्षात ४८० कोटींच्या निधीसाठी पात्र असताना खासदारांकडून निधीची मागणीच न झाल्यामुळे कार्यक्रम अंमलबजावणी आणि नियोजन विभागाने केवळ २०५ कोटी रुपये जारी केले आहेत.केवळ ५५ कोटी रुपये विकासकामासाठी उपयोगात आणले गेले त्याचे प्रमाण अवघे २६.४५ टक्के आहे. अन्य राज्यांतील खासदारांकडून खर्च झालेल्या निधीचे राष्ट्रीय पातळीवरील सरासरी प्रमाण ३३ टक्के असताना महाराष्ट्रातील खासदार कितीतरी मागे आहेत, हेच आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.काही खासदार ठरले अपवाद अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, अरविंद सावंत या शिवसेनेच्या खासदारांनी आपापल्या मतदारसंघात ९० टक्क्यांपेक्षा जास्त निधी खर्च करीत धडाडी दाखवून दिली आहे. राजू शेट्टी, हीना गावित, संजय धोत्रे, हरिश्चंद्र देवराम चव्हाण यांनीही सहकाऱ्यांच्या तुलनेत चांगली कामगिरी बजावली.