बंगळुरु : कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यात प्रसादातून विषबाधा झाल्याने 11 जणांचा मृत्यू झाला असून 80 जणांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांपैकी 12 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
येथील सुलवाडी किच्चुगुट्टी मरम्मा मंदिरात प्रसाद म्हणून 'व्हेज पुलाव' खाल्ल्यानंतर भाविकांना विषबाधा झाल्याचे समजते. विषबाधा झाल्यानंतर भाविकांना कामगेरे, कोल्लेगल आणि मैसूरमधील रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, यामुळे आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून 80 जणांना रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, चामराजनगरचे पोलीस अधीक्षक धर्मेंद्र कुमार मीना यांनी या विषबाधेच्या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच, याठिकाणी असलेल्या आरोग्य विभागाला आवश्यक साधन सामग्री पुरवण्यात आली आहे, अशी माहिती मंड्या आणि मैसूरच्या डीएचओ यांनी दिली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई कर्नाटक सरकारकडून करण्यात आली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले, ही घटना कामगेरे या गावात घडली असून खूप दुर्दैवी आहे.