जोधपूर : राजस्थानमध्ये झालेल्या भीषण रस्ते अपघातात 11 जण जागीच ठार झाले असून तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. बालोतरा फलौदी राज्य मार्गावर मोठ्या ट्रकने जीपला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भयंकर होता की ट्रकखाली जीप चिरडली गेली.
मृतांमध्ये चार पुरुष, सहा महिला आणि एक बालकाचा समावेश आहे. अपघातस्थळी शेरगड पोलिसांनी धाव घेतली. यानंतर क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाजुला करण्यात आली. यानंतर मृतांना आणि जखमींना बाहेर काढले. जखमींना नजिकच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असून मृतांमध्ये नवविवाहित जोडपे असल्याचे सांगितले जात आहे.
या आधी 8 मार्चला दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 32 जण जखमी झाले होते. जोधपूर-जयपूर महामार्गावर झालेल्या अपघातात ट्रक आणि बस एकमेकांवर आदळली होती. यावेळी बसमध्ये प्रवास करणाऱ्या दोन महिल्यांसह चार जणांचा मृत्यू झाला होता. तर 14 जण जखमी झाले होते. दुसऱ्या अपघातात अजमेर-जयपूर हायववेर बस उलटल्याने तीन जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 18 जण जखमी झाले होते.