- धनाजी कांबळेहैदराबाद : आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या प्रचारानंतर तेलंगणातील अनेक मातब्बर उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतपेटीत बंद झाले. या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे ११ डिसेंबरला जाहीर होणार असल्याने सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे.टीआरएसचे नेते आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, टी. हरीश रावत, के. टी.रामा राव, ई. राजेंद्र, जी. जगदीश रेड्डी, जोगू रामण्णा, उत्तमकुमार रेड्डी, जेना रेड्डी कोंडूरू, के. लक्ष्मण, एम.मुरलीधर राव, अकबरूद्दिन ओवेसी यांच्यातील लढत लक्षवेधी ठरणार असून, यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे.टीआरएस विरुद्ध काँग्रेस-टीडीपी-टीजेएस-सीपीआय महाआघाडी अशाच चुरशी बहुसंख्य ठिकाणी होणार असून, काही ठिकाणी भाजपाचे उमेदवारही चांगली टक्कर देतील, असे चित्र आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाला राज्यात पाच जागा मिळाल्या होत्या. एमआयएमची ताकद हैदराबाद शहरातच असून, त्यांनी आठच उमेदवार उभे केले आहेत. गेल्या वेळी त्यांचे सात जण निवडून आलेच होते. यंदा आठही उमेदवार निवडून येतील, असा दावा अकबरुद्दिन ओवेसी यांनी केला आहे.अकबरुद्दिन ओवेसी यांनी टीआरएसला उघड पाठिंबाच दिला आहे. राज्यात टीआरएसचे सरकार येईल, असे ते स्वत:च सांगत आहेत. तरीही टीआरएसला बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्यास ओवेसींचे आमदार मदतीला धावतील, हे स्पष्ट आहे. दुसरीकडे भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीआरएस ही काँग्रेसची बी टीम असल्याची टीका केली असली तरी प्रसंगी राज्यात काँग्रेसचे सरकार येऊ नये, यासाठी भाजपाही टीआरएसलाच बाहेरून पाठिंबा देऊ शकेल. त्यामुळे काँग्रेसच्या पुढाकाराने तयार झालेल्या आघाडीच्या नेत्यांनी भाजपा व टीआरएस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका केली होती. भाजपाने त्याचा इन्कार केला. टीआरएसच्या उमेदवारांच्या विरोधात भाजपाने फार ताकदीचे उमेदवार दिलेले नाहीत, हेही विसरून चालणार नाही. या पार्श्वभूमीवर मतदारांनी कुणाला कौल दिला आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.>ओवेसींची लढत महत्त्वपूर्णएमआयएमचे नेते आणि असुदुद्दीन ओवेसी यांचे बंधू अकबरूद्दीन ओवेसी यांनी चंद्रयागुट्टा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. टीआरएसचे सहा, काँग्रेसचे दोन, भाजपचे दोन आणि एमआयएमचे १ असे ११ उमेदवारांचे भवितव्य मतदारांच्या हातात असून, आता कोणाच्या पारड्यात किती मते पडली आहेत, हे मंगळवारीच कळणार असल्याने अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
तेलंगणात ११ मातब्बरांचे निकाल ठरणार लक्षवेधी!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 4:38 AM