नवी दिल्ली : उत्तर दिल्लीच्या बुरारी भागात एकाच कुटुंबातील ११ व्यक्तींनी केलेल्या कथित आत्महत्या कुटुंबप्रमुख ललित भाटिया यांना त्यांच्या दिवंगत वडिलांनी स्वप्नात दिलेल्या आदेशाबरहुकूम घडवून आणल्या असाव्यात, असे संकेत पोलिसांना तपासात मिळाले आहेत.पोलिसांना दोन वह्यांमध्ये लिहिलेली सुमारे ५० पानांची टिपणे मिळाली आहेत. ते लिखाण ललित भाटिया या घरातील कर्त्या पुरुषाचे असल्याचे स्पष्ट झाले. टिपणांची वाक्यरचना दुसऱ्या कोणाच्या तरी सांगण्यावरून लिहिल्यासारखी तृतीयपुरुषी एकवचनातील आहे.पोलीस यातील गर्भित अर्थ जाणून घेण्यासाठी धडपडत आहेत. ललित यांनी कित्येक वर्षांपूर्वी स्वर्गवासी झालेले त्यांचे वडील स्वप्नात येऊन आपण सर्व निर्णय ‘उपर से आदेश’ आल्यानुसार घेतो, असे लिहिले आहे. कदाचित वडिलांनी दिलेल्या दृष्टांतातील क्रियेनुसारच त्यांनी स्वत:सह घरातील सर्वांच्या ‘मोक्षा’ची पद्धतशीर आखणी केली असावी, असे दिसते.पोलीस लिखाणाच्या विश्लेषणासाठी मनोविकारतज्ज्ञांची मदत घेण्याच्या विचारात आहेत.ही टिपणे २०१५ पासूनची आहेत व त्यावरची शेवटची तारीख यंदाची २५ जून ही आहे. टिपणे संगतवार वाटत असून, या आत्महत्यांसाठी घरातील सर्वांची बºयाच आधीपासून मानसिक तयारी करून घेण्यात आली होती व त्याची रंगीत तालीमही झाली होती, असे दिसते.वडाच्या पारंब्यांचे प्रतीकया टिपणांमध्ये पूर्ण श्रद्धेने वटपूजा करण्याचे महात्म्य विशद करण्यात आले आहे. त्यातही वटवृक्षाच्या खोडाऐवजी त्याच्या पारंब्यांची पूजा करण्यावर भर दिलेला दिसतो. कदाचित फासावर लटकलेल्या देहांचे वडाच्या पारंब्या हे प्रतीक मानले गेले असावे, असेही काहींना वाटते.
११ आत्महत्या मृतात्म्याच्या आदेशावरून? लेखी टिपणांचे गूढ; कुटुंबप्रमुख मृत वडिलांच्या ‘आज्ञे’त!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2018 5:26 AM