हैदराबाद : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जुन्या हैदराबादेत बुधवारी केलेल्या कारवाईत इसिसच्या ११ संशयितांना ताब्यात घेतले आहे. या छाप्यात संघटनेचे ‘टेरर मॉडेल’ उद्ध्वस्त केल्याचा दावा तपास संस्थेने केला आहे. एनआयएने विविध भागांतून ताब्यात घेतलेल्या या ११ तरुणांत एक जण आयटीशी संबंधित व काही पदवीधारकांचा समावेश आहे. त्यांच्याकडून अधिकाऱ्यांनी हत्यारे, दारूगोळा, युरिया, अॅसिड, काही रसायने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि अन्य साहित्य जप्त केले आहे. याशिवाय या तरुणांकडून १५ लाख रुपयांची रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे. हे तरुण इसिसच्या म्होरक्यांच्या इशाऱ्यावरून काम करीत असल्याचा दावाही एनआयए आणि हैदराबाद पोलिसांनी केला आहे.एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या संशयितांनी शहरात अतिरेकी कारवाया करण्याची एक योजना बनविली होती. त्यांच्याकडून १५ लाख रुपये आणि स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, हैदराबादेतील पोलीस सूत्रांनी सांगितले की, विश्वसनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. हैदराबादेतील तरुण व त्यांच्या साथीदारांनी देशाविरुद्ध गुन्हेगारी कट आखला होता. त्यासाठी त्यांनी हत्यारे आणि स्फोटके एकत्र केली होती. या पार्श्वभूमीवर सकाळपासून दहा ठिकाणी शोध घेत धाडी टाकण्यात आल्या. (वृत्तसंस्था)>तेलंगण सरकारवर टीकाभाजपने या प्रकरणात आज तेलंगणा सरकारवर टीका केली. शहरात अतिरेकी प्रवृत्ती वाढत आहेत. सरकारच्या दुर्लक्षामुळे हे घडत असल्याचा आरोपही भाजपचे राज्य प्रवक्ते कृष्णा सागर राव यांनी केला आहे.
हैदराबादेत इसिसचे ११ संशयित ताब्यात
By admin | Published: June 30, 2016 5:32 AM