ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - राजधानी नवी दिल्लीतील रुप नगर परिसरातून एक कुत्रा बेपत्ता झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस अथक प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 24 फेब्रुवारी रोजी ट्रम्प नावाच्या कुत्राचं रुप नगर येथून अपहरण करण्यात आले.
ट्रम्पसंदर्भात माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास परिसरातली सुरक्षा रक्षक ट्रम्पला फिरवत होता. याचदरम्यान त्याचं अपहरण करण्यात आलं. ट्रम्पच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत या प्रकरणातील कोणताही धागादोरा त्यांच्या हाती लागलेला नाही.
तर दुसरीकडे या ट्रम्पचा सांभाळ करणा-या व्यक्तीनं त्याची माहिती देणा-याला बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
"डीएनए"नं दिलेल्या वृत्तानुसार महेंद्र नावाचा व्यक्ती ट्रम्प कुत्र्याचा सांभाळ करत होता. महेंद्रनं सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला त्याला फिरवून आणण्यास सांगितले. यावेळी फिरत असताना ट्रम्प अचानक बेपत्ता झाला. त्याचं अपहरण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ट्रम्प हा 9 वर्षांचा कुत्रा होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा रक्षकानं पोलिसांना सांगितले की, तो कुत्र्याला फिरवत होता. यावेळी कारमधून दोन जण तेथे आले आणि त्यांनी ट्रम्पला त्याच्यापासून हिसकावलं व फरार झाले. मी त्यांना थांबवण्याचा फार प्रयत्न केला मात्र ते कारमध्ये असल्या कारणानं पळून जाण्यात यशस्वी ठरले.
पोलिसांनी सांगितले की, ट्रम्पला वाचवण्याच्या प्रयत्नात सुरक्षा रक्षकही किरकोळ जखमी झाला. ट्रम्पचा सांभाळ करणा-या महेंद्रनं त्याच्या अपहरणाबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित अधिका-यांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासून त्याचा शोध घेत आहेत. मात्र आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही.
तर दुसरीकडे, महेंद्रनं ट्रम्पची माहिती देण्या-याला 11 हजार रुपयांचं बक्षीस देणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र अद्याप कुणाकडे त्याची माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, दिल्लीजवळील शहर गुडगावमधील काही ठिकाणांहूनही पाळीव कुत्रे बेपत्ता होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. अवैध कत्तलखाने बंद झाल्यानंतर या कुत्र्यांची शिकार करुन त्यांना मोमोज, बिर्याणी आणि कबाब या पदार्थांमध्ये त्यांचा मांसाचा वापर करुन ग्राहकांना खायला दिले जाते, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.