देहराडून- शाळेत मिळणाऱ्या माध्यान्ह भोजनाच्या दर्जाबद्दल तक्रार केली म्हणून मुख्याध्यापकांनी 11 वर्षाच्या मुलाला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना देहराडूनमध्ये घडली आहे. मुख्याध्यापकाच्या मारहाणीत मुलगा जखमी झाला असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. देहराडूनमधील जुन्या दळनवाला भागातील सरकारी शाळेत पीडित मुलगा पाचवीच्या वर्गात शिकत होता. राहुल असं विद्यार्थ्याचं नाव आहे.
नसरिन बानो असं मारहाण करणाऱ्या मुख्याध्यापिकेचं नाव आहे. शाळेत मिळणाऱ्या माध्यान्ह भोजनाबद्दल राहुलने तक्रार केली होती. राहुलच्या तक्रारीमुळे चिडलेल्या मुख्याध्यापिकेने राहुलला लोखंडी रॉडने मारहाण केली. मारहाणीमुळे राहुल बेशुद्ध पडला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. राहुलचा एक मित्र त्याला घरी घेऊन आल्यानंतर त्याच्या पालकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
दरम्यान, राहुलच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. राहुलवर कोरोनेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. प्राथमिक तपासानंतर मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं आहे