झारखंड- सिमडेगा जिल्ह्यात एका 11 वर्षीय मुलीचा भूकबळी गेला आहे. रेशन कार्डला आधारशी न जोडल्यामुळे हा बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संतोषी कुमारी नावाची मुलगी आठ दिवस अन्नाविना होती. त्यामुळे तिचा 28 सप्टेंबर रोजी भूकबळी गेला. अन्न सुरक्षेसाठी काम करणा-या एका संस्थेनं याचा खुलासा केला आहे.संस्थेच्या माहितीनुसार, करीमती गावातील संतोषी कुमार हिचा गेल्या महिन्याच्या 28 तारखेला मृत्यू झाला. कारण तिच्या घरात रेशनचं नव्हतं. संतोषीची आई कोईली देवी यांनी एका संस्थेला यासंदर्भात माहिती दिली आहे. आधार कार्ड लिंक न केल्यामुळे फेब्रुवारीपासून त्यांना रेशनिंगवरचं स्वस्त धान्य मिळालं नाही. त्याच दरम्यान 27 सप्टेंबर रोजी संतोषीच्या तब्येतीत बिघाड झाला. तिच्या पोटात अचानकपणे दुखायला लागलं आणि तिचे भुकेनं जीव गेला. परंतु जलदेगा ब्लॉक विकास अधिकारी संजय कुमार यांनी संतोषीचा भुकेनं मृत्यू झाल्याच्या वृत्ताचं खंडन केलं. त्या मुलीचा मृत्यू मलेरियानं झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मात्र मुलीच्या कुटुंबीयांना रेशन कार्डला आधारशी न जोडल्यामुळे त्यांना रेशनिंगवरचं स्वस्त धान्य मिळत नसल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे. भूकबळी गेलेली संतोषी शाळेतील माध्यान्ह भोजन योजनेतून दुपारचं स्वतःचं पोट भरत होती.दुर्गा पूजेची सुट्टी असल्याकारणानं शाळा बंद होती. त्यामुळे तिला अनेक दिवस उपाशी राहावं लागलं. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. भूकबळी गेल्यामुळे झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केलं असून, चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री रघुवर दास यांनी सिमडेगा उपायुक्तांकडून 11 वर्षांच्या झालेल्या मुलीच्या मृत्यूसंदर्भात माहिती घेतली. मुलीचा भूकबळीनं मृत्यू झाल्यामुळे मला अतीव दुःख झालंय. सिमडेगाचे उपायुक्तांना 24 तासांत चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकाराला जबाबदार असणा-या दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. तीन सदस्यांची चौकशी समिती या मृत्यूचा तपास करतेय. चौकशी समितीच्या माहितीनुसार त्या मुलीचा मृत्यू मलेरियानं झाल्याचं समजतंय. मुख्यमंत्र्यांनी उपायुक्तांना 24 तासांत चौकशी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राज्यातील अन्न व नागरी पुरवठा मंत्री या प्रकरणाची चौकशी करणार आहेत
रेशन कार्डला आधारशी न जोडल्याचा भुर्दंड चिमुकलीला, भुकेनं गेला 11 वर्षीय मुलीचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 6:47 PM