हैदराबाद- तेलंगणाच्या करीमनगर जिल्ह्यात राहणाऱ्या एका 11 वर्षीय मुलाने वडिलांच्या दारू प्यायलानंतर होणाऱ्या मारहाणीला कंटाळून पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. वडील मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याची तक्रार या 11 वर्षीय मुलाने दाखल केली आहे. अममिकुंता पोलिसांच्या माहितीनुसार मोलूगुरीमध्ये राहणाऱ्या शशी कुमार या मुलाला त्याचे वडील दररोज दारू पिऊन मारहाण करायचे.
शशी कुमार या मुलाने पोलिसांना लेखी पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे. 'गेल्या काही महिन्यांपासून मला मानसिक व शारीरिक छळाला सामोरं जावं लागलं असल्याचं मुलाने तक्रारीत नमूद केलं आहे. पोलिसांनी मुलाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून शशीचे वडील श्रीनिवासला अटक केली. वडिलांबरोबर राहायचं नसल्याचंही या मुलाने सांगितलं. व्यवस्थित अभ्यास व्हावा व शिक्षण पूर्ण करायला मिळावं, यासाठी हॉस्टेलमध्ये पाठवायची विनंती पीडित मुलाने पोलिसांकडे केली आहे.
शशीचे वडील श्रीनिवास मद्यपी आहेत. ते नेहमी त्यांची पत्नी राम्या आणि मुलगा शशीला दारू पिऊन मारहाण करतात. गुरूवारी रात्री श्रीनिवास दारू पिऊन घरी आला तेव्हा त्याला पत्नी राम्या घरात दिसली नाही. पत्नीच्या या वागणुकीने चिडलेल्या श्रीनिवासने शशीला मारहाण सुरू केली. इतकंच नाही, तर मुलावर त्याने मसालाही भिरकावला. वडिलांच्या या नेहमीच्या वागणुकीला कंटाळलेल्या शशीने अखेरीस पोलिसांचा आसरा घेत तक्रार दाखल केली. दरम्यान, या प्रकरणी पोलीस चौकशी सुरू झाली असून श्रीनिवासला तुरूंगात ठेवण्यात आलं आहे.