जम्मू : जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ तीर्थक्षेत्राच्या यात्रेला येत्या एक जुलैपासून प्रारंभ होत असून, त्यासाठी आतापर्यंत १ लाख १० हजार भाविकांनी नोंदणी केली आहे. भाविकांच्या ऑनलाईन नोंदणीची सुरुवात राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या हस्ते करण्यात आली होती. बालताल व चंदनवाडी या मार्गांद्वारे भाविकांना ही यात्रा करता येणार आहे. विशिष्ट दिवसाचे व मार्गाचा परवाना घेतल्यानंतरच त्या भाविकाला अमरनाथ यात्रेत सहभागी होता येईल. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची नोंदणी २ एप्रिलपासूनच सुरू झाली असून, त्यासाठी पंजाब नॅशनल बँक, जम्मू-काश्मीर बँक, यस बँकेच्या ३२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ४४० शाखांमध्ये सोय करण्यात आली आहे. एक जुलैला सुरू होणारी यात्रा ४६ दिवस चालेल. ती १५ ऑगस्ट रोजी श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी संपेल. या यात्रेसाठी नोंदणी करताना भाविकांनी आरोग्य प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार ज्या वैद्यकीय संस्था व डॉक्टरांना दिले आहेत त्यांची यादी अमरनाथ तीर्थक्षेत्र मंडळाच्या वेबसाईटवर झळकाविण्यात आली आहे.
७५ वर्षांवरील व्यक्तींना प्रवेश नाही१३ वर्षांखालील मुले, तसेच ७५ वर्षांवरील व्यक्ती आणि सहा आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीच्या गरोदर महिलेला अमरनाथ यात्रेत सहभागी होता येणार नाही. केदारनाथ हेलिकॉप्टरने जाणाऱ्यांनी आगाऊ नोंदणी करण्याची गरज नाही. त्यांनी काढलेले तिकीट त्यासाठी विचारात घेतले जाईल. यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी वैद्यकीय प्रमाणपत्र भाविकांनी सादर करणे आवश्यक आहे. यात्रेत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.