नवी दिल्ली - ११० लढाऊ विमाने खरेदी करण्यासंदर्भातील प्रक्रिया भारताने शुक्रवारी सुरू केली. गेल्या काही वर्षांतल्या सर्वात मोठ्या संरक्षण व्यवहारांपैैकी हा व्यवहार असणार आहे. ही विमाने खरेदी करण्यासाठी १५ अब्ज डॉलर खर्च करावे लागतील. भारताला लढाऊ विमाने विकण्यासाठी लॉकहिड मार्टिन, बोइंग, साब, डासॉल्ट, मिग अशा काही बड्या विमाननिर्मिती कंपन्या उत्सुक आहेत.या व्यवहारासाठी भारताने रिक्वेस्ट फॉर इन्फर्मेशन (आरएफएल) किंवा इनिशियल टेंडर जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, या जेट विमानांपैैकी एक तृतीयांश विमाने ही एकआसनी व बाकीची विमाने ही दोनआसनी असतील. यातील ८५ टक्के विमाने ही भारतातच बनविली जातील व १५ टक्के विमाने विदेशात बनविण्यात येतील. विदेशी व भारतीय कंपनीचा हा संयुक्त प्रकल्प असेल.मेक इन इंडिया धोरणांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पात सहभागी होऊ इच्छिणाºया जागतिक स्तरावरील व देशातील कंपन्यांनी आपले प्रस्ताव ६ जुलैैपर्यंत भारताला सादर करायचे आहेत. हवाई दलाच्या ताफ्यातील अनेक विमाने जुनी झाल्याने नव्या विमानांचा लवकरात लवकर समावेश व्हावा, म्हणून या दलातर्फे सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येतो. हवाई दलाच्या सध्या ३१ फायटर स्क्वाड्रन आहेत. प्रत्यक्षात ४१ फायटर स्क्वाड्रनना केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे.राफेल करारानंतरचे मोठे पाऊलहवाई दलासाठी १२६ मल्टि रोल कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट (एमएमआरसीए) विकत घेण्याचा प्रस्ताव सरकारनेच पाच वर्षांपूर्वी रद्द केला होता. त्यानंतर, आता प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने लढाऊ विमानांची खरेदी करण्यात येणार आहे. त्या आधी ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी एनडीए सरकारने फ्रान्स सरकारशी सप्टेंबर २०१६ मध्ये करार केला होता. ७.८७ अब्ज डॉलरचा हा व्यवहार आहे. त्यानंतरचे ११० विमान खरेदीचे मोठे पाऊल सरकारने टाकले आहे.
११० लढाऊ विमाने खरेदीची प्रक्रिया सुरू, हवाई दलाचे आधुनिकीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 1:31 AM