तिरुचिरापल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या वाराणसीतून निवडणूक लढवणार असले तरी यंदा त्यांना व मतदारांना वेगळ्याच प्रश्नाचा सामना करावा लागणार आहे. मोदी यांच्याविरोधात तब्बल १११ शेतकरी निवडणूक लढवणार आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न या निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांच्यापुढे व जनतेपुढे मांडता यावेत, यासाठी १११ शेतकऱ्यांनी निवडणूक लढवण्याचे ठरविले आहे. गंमत म्हणजे यापैकी एकही शेतकरी उत्तर प्रदेशातील नाही. हे सारे शेतकरी तामिळनाडूमधील असतील. तामिळनाडूतील शेतकऱ्यांचे नेते पी अय्याकन्नू यांनी ही घोषणा केली.अय्याकन्नू म्हणाले की, शेतकºयांच्या अनेक समस्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. आता तरी मोदी यांना या समस्यांची जाणीव व्हावी आणि त्यांनी त्या समस्या सोडवाव्यात, अशी आमची इच्छा आहे. कृषी मालाला नफाआधारित दर मिळावा, ही आमची महत्त्वाची मागणी आहे. आॅल इंडिया किसान संघर्ष कोआॅर्डिनेशन कमिटीतर्फे अन्य मतदारसंघांतही शेतकरी उमेदवार असतील. आमच्या मागण्या केवळ भाजपाकडेच नव्हे, तर सर्वच राजकीय पक्षांकडे आहेत. पण केंद्रात भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे मोदी यांच्याविरोधात उमेदवार उभे करण्याचे अय्याकन्नू यांनी ठरविले. खरोखर १0१ शेतकरी वाराणसीतून उभे राहिल्यास तिथे मतदानासाठी अनेक ईव्हीएम ठेवावी लागतील. एका ईव्हीएममध्ये केवळ १६ उमेदवारांचीच नावे असू शकतात. (वृत्तसंस्था)...तर अर्ज मागेमोदी यांनी वाराणसीमध्ये आम्हाला आमच्या मागण्या लगेचच मान्य करण्याचे आश्वासन दिले, तर आम्ही आमचे आंदोलन मागे घेऊ आणि त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे शेतकरीही आपले अर्ज मागे घेतील, असेही अय्याकन्नू यांनी सांगितले. म्हणजेच समस्यांकडे लक्ष वेधणे, एवढाच त्यांचा हेतू असल्याचे स्पष्ट होते.
मोदी यांच्याविरोधात १११ शेतकरी निवडणूक लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 5:30 AM