हैदराबाद - सन २०१६ च्या नियमित बॅचमध्ये निवड झाल्यानंतर येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेणारे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयपीएस) बहुतांश भावी अधिकारी पूर्ण उत्तीर्ण न होता बाहेर पडले आहेत.या बॅचमधील १२२ पैकी तब्बल ११९ अधिकारी एका वा अनेक विषयांत अनुत्तीर्ण झाले. भूतान, नेपाळ व मालदीवमधील १४ प्रशिक्षणार्थींसह ही बॅच एकूण १३४ जणांची होती. अकादमीच्या अंतिम परीक्षेत पूर्ण उत्तीर्ण झाले नसले, तरी हे ११९ अधिकारी आपापल्या नेमलेल्या कॅडरमध्ये ‘प्रोबेशनर’ म्हणून रुजू झाले आहेत, परंतु अनुत्तीर्ण झालेल्या विषयांमध्ये त्यांना पुढील तीन प्रयत्नांत उत्तीर्ण व्हावे लागेल. अन्यथा त्यांना ‘आयपीएस’ सोडावे लागेल. या बॅचमधील जे दोन अधिकारी पूर्णपणे अनुत्तीर्ण झाले, ते या आधीच सेवेतून गेले आहेत. या बॅचमध्ये २१ महिला अधिकारीही होत्या.या अकादमीत एखाद्या बॅचमधील ९० टक्के प्रशिक्षार्थी पूर्ण अनुत्तीर्ण न होणे हे ‘न भूतो’ आहे. विशेष म्हणजे गेल्या आॅक्टोबरमध्ये झालेल्या दीक्षान्त समारंभात ज्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पदके व चषक घेतले, त्यांच्यापैकी काही अधिकारीही सर्व विषयांत उत्तीर्ण होऊ शकलेले नाहीत. परदेशी प्रशिक्षार्थींपैकी एकही उत्तीर्ण झाला नाही. (वृत्तसंस्था)मुख्य विषयांतच ‘दांडी’बॅचमधील काही अधिकाऱ्यांचा एखाद-दुसरा विषय न सुटणे हे नवे नाही, परंतु ९० टक्के प्रशिक्षर्थी पूर्ण उत्तीर्ण न होणे असे अकादमीच्या इतिहासात कधी घडले नव्हते. विशेष म्हणजे, पोलिसांच्या दैनंदिन कामाशी निगडित अशा कायदा व सुव्यवस्था आणि अंतर्गत सुरक्षा यासारख्या विषयांत अनुत्तीर्ण व्हावे, यावरून देशाचे भावी ‘आयपीएस’ अधिकारी कोणत्या दर्जाचे असणार आहेत, हेच दिसते.45 आठवड्यांच्या एकूण प्रशिक्षणात वर्गात बसून शिकण्याच्या व मैदानी अशा दोन प्रकारच्या विषयांचे प्रशिक्षण असते. साक्षीचा कायदा, भारतीय दंड संहिता, दंड प्रक्रिया संहिता, न्यायवैद्यक, फॉरेन्सिक सायन्स आणि तपासाची तंत्रे हे विषय वर्गखोलीत शिकविले जातात.मैदानावर घेतली जाते परीक्षा!शस्त्रांची हाताळणी, पोहणे, योगाभ्यास, अश्वारोहण, नि:शस्त्र युद्धकला व कवायत मैदानावर घेतले जाते.दर चार महिन्यांनी सत्र परीक्षादर चार-पाच महिन्यांनी सत्र परीक्षा होते व त्यातील प्रश्न बहुपर्यायी असतात. अंतिम परीक्षेत दीर्घोत्तरी प्रश्न सोडवावे लागतात.
१२२ पैकी ११९ ‘आयपीएस’ अधिकारी नापास!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 6:29 AM