काँग्रेसचे १२ खासदार, ४० आमदार भाजपत? ३७० जागा जिंकण्याचे लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 06:32 AM2024-02-20T06:32:04+5:302024-02-20T06:32:25+5:30
विनोद तावडेंसह ४ नेत्यांची समिती
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत ५४३ पैकी ३७० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भाजप इतर पक्षांच्या निवडक नेत्यांसाठी आपले दरवाजे खुले करत आहे.
भाजपने लोकसभेच्या १६१ जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. ज्या कधीच जिंकल्या नाहीत, त्या जागा त्यांना आता जिंकायच्या आहेत. त्यासाठी भाजपला इतर पक्षांच्या नेत्यांची मदत घ्यावी लागेल. त्यामुळे अशा नेत्यांच्या प्रवेशाची तपासणी करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री भूपिंदर यादव, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि सरचिटणीस विनोद तावडे आणि सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांचा या समितीत समावेश आहे. काँग्रेसचे डझनभर खासदार, ४० आमदार आणि इतर प्रमुख नेते पुढील तीन आठवड्यांत टप्प्याटप्प्याने पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असे वृत्त आहे. समितीचे लक्ष त्या राज्यांवर केंद्रित आहे जिथे भाजपचे मोठे अस्तित्व आहे. परंतु तरीही ते अशा जागा जिंकू इच्छित आहेत जिथे पक्षाची ताकद कमी आहे.
लक्ष्य किती कुठे?
समितीचे पंजाब, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांवर विशेष लक्ष आहे. उर्वरित दक्षिणेकडील राज्यांसाठी भाजपने १० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
महाराष्ट्रात काय?
महाराष्ट्र, आसाम, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश या राज्यात भाजपचे अधिकाधिक जागांवर लक्ष आहे.
२०१९ मध्ये जिंकलेल्या लोकसभेच्या जागांव्यतिरिक्त पक्ष या राज्यांमधून किमान २५ हून अधिक जागा जोडू शकेल असे भाजपच्या कोअर टीमला वाटते.
छिंदवाडा भाजपला अनेक दशकांमध्ये जिंकता आलेली नाही.
इतर पक्षांतील मातब्बर नेते सामील झाले तर पंजाब, पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, झारखंड आणि इतर काही राज्यांतील लोकसभेच्या १० जागांची यात भर पडू शकते.