नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये नव्या संसद भवनासह आणखी काही इमारतींच्या बांधणीचा सुमारे २० हजार कोटी रुपये खर्चाचा सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प केंद्र सरकार धडाक्यात राबवत आहे. या प्रकल्पासाठी इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स, शास्त्री भवन, कृषी भवन, विज्ञान भवन अशा ऐतिहासिक महत्त्वाच्या बारा इमारती पाडण्यात येतील.
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या बांधकामावर काँग्रेससहित अन्य विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी ४,५८,८२० चौरस मीटर क्षेत्रफळावर सध्या अस्तित्वात असलेली बांधकामे पाडण्यात येणार आहे. त्या जागी नवीन संसद भवन, पंतप्रधान, उपराष्ट्रपती यांच्यासाठी नवी निवासस्थाने तसेच सरकारी कार्यालयांसाठी दहा नव्या इमारती असे बांधकाम करण्यात येईल.
नवे संसद भवन २०२२पर्यंत बांधून पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. उपराष्ट्रपतींचे निवासस्थान सध्या नॅशनल म्युझियमजवळ आहे. त्यांचे नवे घर नॉर्थ ब्लॉकमध्ये बांधले जाईल. पंतप्रधानांचे नवे निवासस्थान व कार्यालय हे साउथ ब्लॉकमध्ये बांधण्यात येणार आहे. सध्या केंद्रीय परराष्ट्र खात्याचे कार्यालय जवाहरलाल नेहरू भवनमध्ये आहे. त्यासाठी सात मजल्यांची इमारत बांधण्यात येईल. कृषी भवन, शास्त्री भवन या इमारती पाडून ती कार्यालये नव्या सचिवालयात हलविण्यात येतील. तसेच विज्ञान भवनाची इमारत पाडून तिथे नवीन कॉन्फरन्स हॉल बांधण्यात येईल.
या इमारती होणार जमीनदोस्तसेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी पाडण्यात येणाऱ्या १२ इमारतींमध्ये इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्टस् या इमारतीचा समावेश आहे. या इमारतीचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत १९ नोव्हेंबर १९८५ रोजी उद् घाटन झाले होते. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या स्मरणार्थ बांधलेले शास्त्री भवन, कृषी भवन, विज्ञान भवन, उपराष्ट्रपतींचे निवासस्थान, नॅशनल म्युझियम, जवाहरलाल नेहरू भवन, निर्माण भवन, उद्योग भवन, रक्षा भवन, नॅशनल अर्काइव्हजची उपइमारत, लोककल्याण मार्ग आदी वास्तू पाडण्यात येणार आहेत.