मोरबी : गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात मीठ पॅकेजिंग कारखान्याची एक भिंत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत १२ मजूर ठार झाले. हलवाड औद्योगिक वसाहतीमधील सागर साल्ट कारखान्यात बुधवारी दुपारी ही दुर्घटना घडली. मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी २ लाख तर गुजरात सरकारकडून ४ लाखांच्या भरपाईची घोषणा करण्यात आली.
कामगार आणि रोजगार मंत्री व स्थानिक आमदार बृजेश मेरजा यांनी सांगितले की, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचविण्याचे कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना दोन-दोन लाख रुपयांची मदत घोषित केली आहे.पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करून महिती दिली की, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना दोन-दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल.
प्रशासनाला मदत आणि बचाव कार्याबाबत निर्देश
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ट्विट करून या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवरून बचाव कार्याची माहिती घेतली. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांंनी मृतांच्या कुटुंबीयांना चार-चार लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी जिल्हा प्रशासनाला मदत आणि बचाव कार्याबाबत निर्देशही दिले आहेत, असे मुख्यमंत्री कार्यालयातर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)