ऑनलाइन लोकमत
मेक्सिको सिटी, दि. 29 - ती कुणी सेलेब्रिटी नाही, की कुण्या बड्या धनिकाची किंवा राजकारण्याची मुलगी नाही. पण तरीही तिच्या वाढदिवसाला तब्बल 12 लाख लोकांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे सध्या तिचा वाढदिवस सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
ही गोष्ट आहे मेक्सिकोतील एका गावात राहणाऱ्या रुबी इबारा गार्सिया या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलीची. सोमवारी तिने आपला 15 वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी लाखो लोक पाहुणे म्हणून तिच्या गावी पोहोचले होते. त्याचे झाले असे की, रुबीच्या वडलांनी आपल्या मुलीचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून आपले नातेवाईक मित्र आप्तेष्ट यांना वाढदिवसाचे आमंत्रण दिले. बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
आपण पाठवलेला व्हिडिओ एवढा प्रसारित होईल, याची कल्पना रुबीच्या आई-वड़लांनीही केली नव्हती. या निमंत्रणाची चर्चा एवढी की मेक्सिकोतील म्युझिकल स्टार्स पार्टीत येण्याविषयी चर्चा करू लागले. काही कंपन्यांनी तर जाहीरातीचीहा ऑफर दिली. अगदी मेक्सिकन एअरलाइन्सनेही रुबीच्या वाढदिवसाला जाण्यासाठी 30 टक्के सुट देण्याचीही घोषणा केली.
त्यामुळे प्रत्यक्ष वाढदिवसादिवशी नातेवाईकांसोबतच लाखो अनोळखी लोकही हजर झाले. बघता बघता गर्दी इतकी वाढली की गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. एवढा गाजावाजा झाल्यावर प्रसारमाध्यमांनीही तेथे धाव घेतली आणि रुबीचा वाढदिवस खऱ्या अर्थाने दणक्यात साजरा झाला.