ऑनलाइन लोकमत
पुरुलिया, दि. 29 - आपल्या मनाविरुद्ध जबदस्तीने लावण्यात येणारं लग्न थांबवण्यासाठी अल्पवयीन मुलीने 12 किमी पायी चालत पोलीस स्टेशन गाठलं आणि मदत मागितली असल्याची घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथील ही घटना आहे. ही अल्पवयीन मुलगी आदिवासी असून तिचे आई - वडिल जबरदस्तीने तिचं लग्न लावत होते. मुलाच्या घरचे नातेवाईक रोज मुलीच्या घरी येऊन लग्न करण्याचा तगादा लावत होते. यानंतर मुलीने 12 किमी पायी चालत पोलीस स्टेशन गाठले आणि मदत मागितली. अल्पवयीन नमिता महतो सध्या 11 वीत शिकत आहे.
मुलीने पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नमिताच्या आई - वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं. मुलीच्या पालकांनी प्रतिज्ञातपत्रावर स्वाक्षरी करत लग्नाचं वय झाल्याशिवाय मुलीचं लग्न न करण्याचं आश्वासन दिलं आहे. नमिता (16) गेल्या दीड महिन्यांपासून आपल्या आई - वडिलांना माझं लग्न इतक्या लवकर करु नका सांगत समजावण्याचा प्रयत्न करत होती. नमिताने निर्भयपूर गावातील हायस्कूलमध्ये आपलं पुढील शिक्षण पुर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र तिच्या इच्छेला बाजूला सारत लग्न लावून देण्याचा निर्णय तिच्या पालकांनी घेतला.
नमिताचे वडील दिनेश एक शेतकरी करुन आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी त्यांना दुस-याच्या शेतात राबावं लागतं. तर नमिताची आई कंगशा गृहिणी आहेत. त्यांनी अजून एक 13 वर्षांची मुलगी आहे. दोघांनीही पुनुरु गावातील एका मुलाला नमितासाठी पसंद केलं होतं. मंगळवारी मुलाच्या घरच्यांना लग्नाची तारीख ठरवण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. एकीकडे नमिताला बघण्याच्या कार्यक्रमाची तयारी सुरु असताना इकडे तिने घरातून पळ काढला होता. गावातून पोलीस स्टेशनपर्यंत जाण्यासाठी वाहतुकीचं कोणतंच साधन नसल्याने नमिताला 12 किमी पायी चालत जावं लागलं.
दोन तास पायी चालल्यानंतर नमिता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. नमिता पोलीस ठाण्यात असलेल्या अधिका-याकडे आपलं जबरदस्तीने लग्न लावलं जात असल्याची तक्रार केली. पुरावा म्हणून नमिताने कागजपत्रंही सोबत नेली होती, ज्यामध्ये तिच्या जन्मतारखेची नोंद होती. यानंतर नमिताच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं. नमिताने धीर दाखवत उचललेल्या या पावलासाठी पोलीस अधिका-याने तिला ड्रेस गिफ्ट दिला. 'नमिताला योग्य शिक्षण मिळेल. तसंच त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही याकडे लक्ष देवू. नमिताला संगणक प्रशिक्षणही देऊ', असं पोलीस अधिका-याने सांगितलं आहे.