सुनील चावके
नवी दिल्ली : ‘शरद पवार यांच्यानंतर कोण?’ या अकस्मात उद्भवलेल्या प्रश्नामुळे चिंतेत पडलेल्या देशभरातील विरोधी पक्षांचा जीव पवारांच्या ‘यू-टर्न’मुळे भांड्यात पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे रौप्य महोत्सवी वर्ष तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी ऐक्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका यामुळे वयाच्या ८३ व्या वर्षीही पवार यांचे केवळ राज्याच्याच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणातही महत्त्व अबाधित आहे.
लोकसभा निवडणूक बारा महिन्यांवर आली असताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची अकस्मात घोषणा केल्यामुळे विरोधी पक्षांच्या एकजुटीतील महत्त्वाच्या घटकावर प्रश्नचिन्ह लागले होते. पण पवारांनी तीन दिवसानंतर आपलाच निर्णय फिरवून विरोधकांची ही चिंता तूर्तास तरी दूर केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी पवार यांना राजीनामा मागे घेण्याचा आग्रह केला होता. इतर प्रादेशिक पक्ष नेत्यांनाही पवारांचा राजीनाम्याचा निर्णय रुचला नव्हता.
राष्ट्रीय राजकारणातील मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसशी जमत नसल्यामुळे भाजपविरोधात अजूनही एकजूट होत नसलेल्या अनेक प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांसोबत पवारांचे अतिशय सलोख्याचे आणि सौहार्दाचे संबंध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर विरोधी ऐक्याची नाळ तुटण्याची शक्यता निर्माण झाली असती. अजित पवार, सुप्रिया सुळे किंवा अन्य कोणत्याही नेत्याने शरद पवार यांची जागा घेतली असती तर विरोधी पक्षांमध्ये आज आहे तसा समन्वय कायम राहू शकला नसता, या शक्यतेमुळे विरोधी पक्ष चिंताग्रस्त झाले होते.
भाजपच्या मनसुब्यांना धक्का
शरद पवार यांच्या वक्तव्यांनी कोंंडीत सापडलेल्या भाजपला अनेकदा फायदा झाला आहे. पण पवार यांनी भाजपला धक्केही दिले आहेत.
शरद पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसला कवेत घेऊ पाहणाऱ्या भाजपच्या मनसुब्यांना यामुळे झटका बसला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचा तीन दशकांहून अधिक काळचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसारख्या कट्टर हिंदुत्ववादी पक्षाशी २०१९ साली राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी करायला लावून पवार यांनी भाजपला यापूर्वीही झटका दिला आहे.
प्रादेशिक पक्षनेत्यांचा सिल्व्हर ज्युबिली क्लब
एम. करुणानिधी (द्रमुक, १९६९ ते २०१८, ४९ वर्षे)
डॉ. फारुक अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्स, १९८१ ते २००२ आणि २००९ ते २०२२, ३४ वर्षे)
मुलायमसिंह यादव (समाजवादी पक्ष, १९९२ ते २०२२, ३० वर्षे)
जयललिता (अण्णा द्रमुक, १९८९ ते २०१६, २७ वर्षे)
लालूप्रसाद यादव (राष्ट्रीय जनता दल, १९९७ पासून आजतागायत, २६ वर्षे)
ममता बनर्जी (तृणमूल काँग्रेस, १९९८ पासून आजतागायत, २५ वर्षे)
प्रकाशसिंह बादल (शिरोमणी अकाली दल, कालखंड उपलब्ध नाही)
शरद पवारांसाठी २०२४ महत्त्वाचे
१९९९ साली स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आणि लोकसभा निवडणुकीतील सक्रिय सहभागाचे संभवतः शेवटचे वर्ष असल्यामुळे शरद पवार यांच्यासाठी २०२४ महत्त्वाचे ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक लागल्यास विरोधी पक्षांना एकजूट करण्यात पवार यांची भूमिका निर्णायक ठरू शकते. २०२४ साली शरद पवार यांना अध्यक्षपदाची सिल्व्हर ज्युबिली साजरी करण्याची संधी असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे १९९९ पासून अध्यक्ष असलेले पवार यांच्याप्रमाणेच एच. डी. देवेगौडा (जनता दल सेक्युलर, १९९९ पासून २४ वर्षे) आणि मायावती (बसपा २००१ पासून २२ वर्षे) यांना पक्षनेतृत्वाची पंचवीस वर्षे पूर्ण करण्याची प्रतीक्षा आहे.