शिलाँग - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला धूळ चारत सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची सत्ता मिळवल्यानंतर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने पक्षाच्या देशव्यापी विस्ताराची मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून देशातील विविध राज्यांमध्ये इतर पक्षातील नेत्यांना तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश दिला जात आहे. दरम्यान, आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्लीत असताना तिकडे ईशान्य भारतात तृणमूल काँग्रेसने काँग्रेसला मोठे भगदाड पाडले आहे.
ईशान्य भारतातील मेघालयमध्ये तृणमूलने काँग्रेसला खिंडार पाडले आहे. मेघालयमध्ये काँग्रेसच्या १८ आमदारांपैकी तब्बल १२ आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये जाणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे नेते आणि मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांचाही समावेश आहे. काँग्रेसमधून तृणमूल काँग्रेसमध्ये घाऊक प्रमाणात झालेला पक्षप्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, आज दिल्ली दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांची भेट घेटली. मात्र ममता बॅनर्जींनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणे मात्र टाळले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्यानंतर ममता बॅनर्जींना सोनिया गांधींसोबतच्या भेटीबाबत त्या म्हणाल्या की, त्यांना भेटण्याचा कुठलाही कार्यक्रम नाही आहे. ते लोक पंजाबच्या निवडणुकांमध्ये गुंतलेले आहेत. त्यानंतर त्या म्हणाल्या की, आम्ही सोनिया गांधी यांना प्रत्येक वेळी भेटलं पाहिजे का, घटनात्मकरीत्या हे अनिवार्य नाही आहे.