बाडमेर : राजस्थानमधील बाडमेर-जोधपूर महामार्गावर बुधवारी भीषण अपघात झाला. खासगी प्रवासी बस आणि टँकरमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेमुळे टँकर आणि बसला आग लागली, त्यात 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच, या दुर्घटनेत अनेक जण जखमीही झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या बारमेर जिल्ह्यातील बाडमेर-जोधपूर महामार्गावर पाचपदरा पोलीस स्टेशन क्षेत्रातील भंडियावास गावाजवळ सकाळी 11.30 वाजता हा अपघात झाला. हा अपघात झाला तेव्हा बसमध्ये २५ जण होते, असे सांगण्यात येत आहे. धडकेनंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. यामुळे बसमधील काही लोक त्यात अडकले, काही लोक खिडकी तोडून बाहेर आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत 10 लोकांना बसमधून बाहेर काढले. या अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. अपघातातील जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच या अपघातातील जखमींना योग्य ते उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत.