बिहारमध्ये उन्हाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. गुरुवारी राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. प्रचंड उन्हामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. औरंगाबादच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उष्णतेच्या लाटेमुळे १२ जणांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक जण वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल आहेत. याशिवाय झारखंडच्या पलामू जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
अनेक राज्यांप्रमाणेच बिहार आणि झारखंडमध्येही कालचे तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. पलामू जिल्ह्यात गुरुवारी कमाल तापमान ४७.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गेल्या तीन दिवसांपासून पलामूचे कमाल तापमान ४७ अंशांपेक्षा जास्त नोंदवले जात आहे. सूर्य उगवताच उष्णतेमुळे रस्त्यावरून चालणे कठीण झाल्याचं लोक सांगत आहेत.
बिहारमध्येही अशीच परिस्थिती आहे. बक्सरमध्ये सर्वाधिक ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील उष्णतेच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारने बुधवारी सर्व खासगी आणि सरकारी शाळा, कोचिंग संस्था आणि अंगणवाडी केंद्रे ८ जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शेखपुरा, बेगुसराय, मुझफ्फरपूर आणि पूर्व चंपारण जिल्ह्यांमधून आणि इतर भागांमध्ये कडक उन्हामुळे शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी बेशुद्ध पडल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत.
येत्या काही दिवसांत बिहारच्या अनेक भागात भीषण गरमी कायम राहणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. गुरुवारी ४७.१ अंश तापमानासह बक्सर हे राज्यातील सर्वात उष्ण ठिकाण ठरलं. औरंगाबाद (४६.१ अंश सेल्सिअस), देहरी (४६अंश सेल्सिअस), गया (४५.२ अंश सेल्सिअस), अरवल (४४.८ अंश सेल्सिअस) आणि भोजपूर (४४.१ अंश सेल्सिअस) या ठिकाणी ४४ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. पाटणा येथे कमाल तापमान ४०.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर लोकांना वारंवार 'या' सूचना केल्या जात आहेत
- उन्हात जाणं शक्यतो टाळा. उष्णतेची लाट/उष्णतेच्या इशाऱ्यांकडे लक्ष द्या.- शक्य तितके पाणी प्या. तहान लागली नसली तरी पाणी प्या.- हलक्या रंगाचे घाम शोषणारे सुती कपडे घाला.- घराबाहेर पडताना सनग्लासेस, छत्री, टोपी यांचा वापर करा.- तीव्र सूर्यप्रकाशापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी छत्री वापरा.- ताक, लस्सी, नारळपाणी, लिंबू पाणी, फळांचा ज्यूस प्या. - अशक्त किंवा आजारी वाटत असल्यास, ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या.