नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या गुप्तचर शाखेने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या (जेईएम) १२ जणांना अटक केली. पाकिस्तानातील या संघटनेचे हे १२ जण सहानुभूतीदार होते. त्यापैकी तीन जणांना १० दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या सगळ्यांना दिल्ली आणि एनसीआरमधून ताब्यात घेण्यात आले. जैश-ए- मोहम्मदच्या विचारसरणीला पाठिंबा देत असल्याबद्दल आम्ही दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून त्यांना मंगळवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून एक आयईडी जप्त करण्यात आला, असे विशेष पोलीस आयुक्त (विशेष शाखा) अरविंद दीप यांनी सांगितले. हे सगळे संशयित दहशतवादी ३० वर्षांच्या आतील आहेत. त्यातील काही कायम दिल्लीतील तर काही उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. राजधानी दिल्ली आणि इतर ठिकाणी करायच्या हल्ल्यांचा कट ते करीत होते व जैश-ए-मोहम्मदसाठी ते येथे छुप्या पद्धतीने काम करणाऱ्या शाखेचे सदस्य आहेत असा आमचा संशय आहे, असे दीप म्हणाले. या सगळ्यांची नावे व राष्ट्रीयत्व जाहीर करण्यात आलेले नाही. त्यांची चौकशी विशेष शाखा आणि गुप्तचर विभागाचे अधिकारी करीत आहेत.इसिसचे ४९ अटकेत- दहशतवादामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कुख्यात बनलेल्या इसिस या अतिरेकी संघटनेचे नापाक मनसुबे हाणून पाडण्यासाठी भारतीय गुप्तचर आणि सुरक्षा संस्थांनी सायबर विश्वात करडी निगराणी चालविली आहे.- युवकांची भरती करण्यासाठी इसिसकडून इंटरनेटचा वापर होत असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये इंटरनेटमार्फत इसिसच्या संपर्कात आलेल्या एकूण ४९ जणांना अटक करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील चार जणांचा समावेश आहे.
दिल्लीत पकडले १२ संशयित अतिरेकी
By admin | Published: May 05, 2016 3:50 AM