नवी दिल्ली - घरात लहान भावंडांमध्ये छोट्या-छोट्या कारणांसाठी भांडणं होतच असतात. मात्र दिल्लीमध्ये भावाने टीव्हीचा रिमोट न दिल्याने बहिणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भावाशी रिमोटवरून भांडण झाल्यानंतर 12 वर्षीय मुलीने स्वत:ला बेडरुमध्ये कोंडून घेतलं आणि गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
दिल्लीच्या उत्तरपूर्व भागातील सीलमपूर येथे ही घटना घडली. आई-वडील घरी नसताना मुलीचं तिच्या 7 वर्षाच्या लहान भावासोबत रिमोटवरून भांडण सुरू झालं. आवडता कार्यक्रम पाहण्यासाठी बहिणीने रिमोट मागितला, पण भावाने चॅनल बदलण्यास नकार दिला. त्यावेळी त्यांचा मोठा भाऊ त्याच्या खोलीत अभ्यास करत होता. भांडणाचा आवाज ऐकून मोठ्या भावाने हस्तक्षेप करत दोघांना शांत केलं. पण संतापलेल्या बहिणीने त्यानंतर बेडरूममध्ये स्वत:ला कोंडून घेतलं.
छोट्या भावाने दरवाजा उघडण्यासाठी आवाज देण्यास सुरुवात केली. पण आतून बहिणीचा आवाज येणं बंद झाल्यानंतर त्याने हा प्रकार मोठ्या भावाला सांगितला. मोठ्या भावाने खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा बहिणीने पंख्याला लटकून गळफास घेतला होता. त्याने तातडीने तिला खाली उतरवले. आई-वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली. तसेच बहिणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तीन दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र रविवारी तिची प्रकृती आणखी खालावली आणि तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.