आतापर्यंत तुम्ही हृदयविकाराच्या झटक्याने अनेक वयस्कर किंवा तरुणांचा मृत्यू झाल्याचे ऐकले असेल, परंतु आता हृदयविकाराच्या झटक्याने एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातून समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयात मृतावस्थेत आलेल्या मनीष जाटव या 12 वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा अचानक कार्डियाक अरेस्टमुळे मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भिंड येथील रहिवासी कोमल जाटव यांचा मुलगा मनीष स्कूल बसने शाळेतून परत येत होता. सीटवर बसताच अचानक तो बेशुद्ध पडला, यानंतर बस चालकाने शाळेच्या मुख्याध्यापकांना याची माहिती दिली. त्यांनी मनीषला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण काही उठलाच नाही. यानंतर त्याच्या आई-वडिलांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ मनीषला जिल्हा रुग्णालयात नेले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. अनिल गोयल यांनी सांगितले की, त्यांच्या टीमने मनीषला CPR देऊन उठवण्याचा प्रयत्न केला, पण सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला होता. मनीषचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती त्यांनी दिली. कारण, मनीषचा मृत्यू ज्या परिस्थितीत झाला, ती सर्व लक्षणे कार्डियाक अरेस्टची आहेत.