12 candidates died police Bharti : झारखंडमध्ये पोलीस भरती दरम्यान १२ उमेदवारांचा मृत्यू झाला. शारीरिक चाचणीवेळी ही घटना घडली. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली असून, राजकारणही तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी १२ उमेदवारांचा मृत्यू कोरोना लसीमुळे झाल्याचा दावा केला आहे. या घटनेला सोरेन यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. (12 candidates died due to corona Vaccine says Hemant soren)
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ४ सप्टेंबर रोजी झारखंडची राजधानी रांचीमध्ये बोलताना हे विधान केले. लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर झारखंडमध्ये मईंया सन्मान योजना सुरू करण्यात आली असून, पैसे वितरण कार्यक्रमात सोरेन यांनी पोलीस भरतीदरम्यान झालेल्या मृत्यूंच्या घटनेवर भाष्य केले.
12 उमेदवारांचा मृत्यूचे कारण कोविड लस -हेमंत सोरेन
"आता जी शिपाई भरती सुरू आहे, त्यात काही घटना घडली आहे. काही तरुणांचा धावताना अचानक मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू फक्त धावण्यामुळे झाली नाही. लोक चालता चालता मरत आहेत", असे सोरेन म्हणाले.
"कोरोना काळात भाजपच्या लोकांनी या देशात लसीकरण केले. त्यांनी चुकीची लस दिली, ज्याचा दुष्परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. आता त्याचा हिशोबही आम्ही घेऊ. त्या लसीला पूर्ण जगात बंद करण्यात आले होते. पण, भारतात त्या लसीचा पुरवठा करण्यात आला आणि परिणाम असा झाला की, आज देशात अनेक लोकांचा मृत्यू होत आहे. सर्दी-खोकला होऊन लोकांचा मृत्यू होत आहे. चालता- चालता लोक मरत आहेत. धावताना लोक मरत आहे. वयोवृद्ध नाही, तरुण मुला मुलींचा मृत्यू होत आहे", असे दावा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला.
पैसा उकळण्यासाठी भारतीयांना लस दिली -सोरेन
मुख्यमंत्री हेमंत सोरेन असेही म्हणाले की, "ही लस संपूर्ण जगात बंद करण्याची नोटीस काढण्यात आली होती. पण, या लोकांनी (भाजप) पैसे आणि देणग्या वसूल करण्यासाठी देशवासियांना जबरदस्ती ती लस दिली गेली", असा आरोप हेमंत सोरेन यांनी केला.