आजच्या काळात विमान प्रवास हा अतिशय वेगवान, आरामदायक आणि सुरक्षित मानला जातो. मात्र या विमान प्रवासादरम्यानही अनेकदा आणीबाणीचे प्रसंग उद्भवतात. अशीच घटना आज तामिळनाडूमधील त्रिची विमानतळावर घडली. येथून संध्याकाळी ५.४५ च्या सुमारास शारजाहच्या दिशेने रवाना झालेल्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाण करताच निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मोठी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. मात्र वैमानिकाने प्रसंगावधान राखत आणि संयमानं परिस्तिती हाताळत या विमानाला सुखरूपपणे त्रिची विमानतळाच्या धावपट्टीवर उतरवले.
त्रिची विमानतळावरून उड्डाण केलेल्या एअर विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये झालेल्या बिघाडाची माहिती मिळताच विमानाच्या वैमानिकासह विमानतळावर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. विमानतळावर हायअलर्ट देण्यात आला. आणीबाणीच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब आणि रुग्णवाहिक तैनात करण्यात आल्या.
या विमानातून १४१ प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे त्यांची सुरक्षितता हाही मुद्दा होताच. अशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते. तेव्हा विमानातील मुख्य वैमानिकाची भूमिका महत्त्वाची ठरते. तसेच त्यांनाच परिस्थिताचा आढावा घेऊन निर्णय घ्यावे लागतात. त्यांना सहकार्य करण्यासाठी संपूर्ण टीम असते. तसेच वैमानिकांकडून दाखवण्यात येणारं प्रसंगावधान अधिक उपयोगी ठरतं. एअर इंडियाच्या या विमनात झालेल्या तांत्रिक बिघाडाची कल्पना आल्यानंतर वैमानिकांनी विमानातील इंधनाची पातळी कमी करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी हवेत घिरट्या घालण्यास सुरुवात केली. सुरक्षेच्या दृष्टीने विमानातील इंधन पुरेसं कमी झाल्यानंतर विमानाचं आपातकालीन लँडिंग करण्यात आलं. यादरम्यान, विमानातील बिघाड दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तसेच त्यामध्ये यश आल्यानंतर विमानाला सुरक्षितपणे उतरवण्यात आलं.