अयोध्या : शेकडो रामभक्तांचे बलिदान आणि अनेक दशकांच्या प्रतिक्षेनंतर प्रभू श्रीराम आपल्या जन्मभूमी अयोध्येत विराजमान होत आहेत. 22 जानेवारी रोजी लाखो लोकांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि रामललाची प्राणप्रतिष्ठा होईल. या भव्यदिव्य सोहळ्यात चोख सुरक्षा व्यवस्था राखणे, हे पोलिस प्रशासनासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. अयोध्येतील प्रत्येक कानाकोपऱ्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. रामभक्तांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही चूक होऊ नये यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स-एआयचाही वापर केला जातोय.
22 जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी अयोध्येत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सुरक्षा भंगाच्या संशयास्पद इनपुटनंतर गृह मंत्रालयाने एक अलर्ट देखील जारी केला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनीअयोध्या आणि आसपास सुमारे 12000 सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. 10000 सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. याशिवाय सुरक्षेचे उल्लंघन आणि संबंधित धोक्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही समावेश करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांचे कायदा आणि सुव्यवस्थेचे महासंचालक प्रशांत कुमार यांनी मीडियाला सांगितले की, "रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी सायबर धोक्याचा सामना करण्यासाठी गृह मंत्रालयाने एक उच्चस्तरीय सायबर तज्ञ टीम अयोध्येत पाठवली आहे. यासाठी नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आले आहेत, जिथे वेगवेगळ्या एजन्सी कथित धोक्यांवर रिअल-टाइम आधारावर लक्ष ठेवत आहेत. याशिवाय शहरातील कानाकोपऱ्यात सुरक्षा यंत्रणा तैनात असतील."
मंदिराभोवती 400 कॅमेरेप्रशांत कुमार यांनी सांगितले की, "अयोध्या शहरात आणि आसपास सुमारे 10,000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यापैकी सुमारे 400 मंदिराभोवती आणि यलो झोनमध्ये आहेत. यलो झोनमध्ये संशयास्पद चेहरे ओळखण्यासाठी, गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी आणि रेकॉर्डशी जुळवून घेण्यासाठी एआयचा वापर केला जाईल. एआय-आधारित सीसीटीव्ही मॉनिटरिंग सिस्टीम चेहरे ओळखण्यात मदत करेल," असेही त्यांनी सांगितले.