पाटणा : बिहारमध्ये १२वी कला शाखेच्या परीक्षेत पहिल्या आलेल्या मुलीने कॅमेऱ्यासमोर राज्यशास्त्र हा विषय पाककलेशी संबंधित असल्याचे सांगितले, तर तिच्याच कॉलेजमधील आणि विज्ञान शाखेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्याला पाणी व एचटूओ यांचा संबंध काय, यांसारख्या प्राथमिक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. या पार्श्वभूमीवर बिहार शालेय परीक्षा मंडळाने (बीएसईबी) गुणवत्ता यादीतील सर्व विद्यार्थी या मानास पात्र आहेत का याची पडताळणी करण्यासाठी त्यांची पुन्हा छोटी परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. बिहारमध्ये १२ वीच्या तिन्ही शाखांचा निकाल गेल्या आठवड्यात जाहीर झाल्यानंतर स्थानिक वाहिन्यांनी गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यात त्यांच्या गुणवत्तेचा भंडाफोड झाला. बीएसईबीने कला, वाणिज्य व विज्ञान शाखांतील सर्व १४ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना छोटेखानी फेरपरीक्षेसाठी ३ जून रोजी पाचारण केले आहे. कला शाखेतील विद्यार्थिनी रुबी रॉय हिने पॉलिटिकल सायन्स (राज्यशास्त्र) विषयाचा ‘प्रोडिगल सायन्स’ असा उच्चार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंडळाने तातडीने गुणवत्ताधारकांच्या फेरपरीक्षेचा निर्णय घेतला. सोबतच या प्रकरणाच्या चौकशीचेही आदेश दिले. रुबीला राज्यशास्त्रात १००पैकी ९१ गुण मिळाले असून, एकूण ५०० गुणांच्या परीक्षेत तिने ४४४ गुण संपादित केले आहेत. मात्र, परीक्षा एकूण किती गुणांची होती असे विचारले तेव्हा तिने उत्तर दिले ६०० गुणांची. विशेष म्हणजे रुबी टी.व्ही. चॅनलशी बोलत असताना तिचा एक नातेवाईक तिला पाठीमागून प्रश्नांची उत्तरे सांगण्याचा प्रयत्न करीत होता. विज्ञान शाखेचा टॉपर सौरव श्रेष्ठा यालाही मूलभूत प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. त्याने अॅल्युमिनियम हा सक्रिय धातू असल्याचे सांगितले. एवढेच नाहीतर, सोडियम आणि इलेक्ट्रॉन्सचीही त्याला माहिती नव्हती. बीएसईबीचे चेअरमन लालकेश्वर प्रसाद सिंग म्हणाले की, गुणवत्ता यादीत आलेल्या सर्वांची एक छोटी लेखी परीक्षा घेण्यात येणार असून, त्यासोबत आपण प्रत्येकाची मुलाखत घेणार आहोत. यात विद्यार्थी अपयशी ठरला, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.बिहारमध्ये १५ लाख विद्यार्थ्यांनी १२वीची परीक्षा दिली होती. त्यातील १४ जण गुणवत्ता यादीत आले असून, गुणवत्ता यादीतील बहुतांश विद्यार्थी पाटणा शहरापासून २० कि.मी. अंतरावर असलेल्या हाजीपूर येथील व्ही.एन. रॉय कॉलेजचे आहेत.गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना साध्या प्रश्नांची उत्तरे न येणे हा प्रकार धक्कादायक आहे. या प्रकरणात एकाच्या नावावर दुसऱ्याने परीक्षा दिली असेल किंवा परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका बदलल्या असाव्यात, असा संशय असल्याचे राज्याचे शिक्षणमंत्री अशोक चौधरी यांनी सांगितले.
१२वीच्या ‘टॉपर’ची होणार फेरपरीक्षा
By admin | Published: June 03, 2016 2:47 AM