नवी दिल्ली - एअरलाईन्स आणि एअरपोर्टचे 13 कर्मचारी मद्यपान चाचणीत नापास झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कर्मचाऱ्यांची मद्यपान चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये इंडिगो, स्पाइस जेट आणि गोएअरचे 13 कर्मचारी नापास झाल्याचे आढळून आले असून त्यांना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 सप्टेंबर रोजी एअरलाईन्स आणि एअरपोर्टच्या कर्मचाऱ्यांची मद्यपान चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये 13 कर्मचारी नापास झाल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
13 कर्मचाऱ्यांपैकी सात कर्मचारी हे इंडिगोचे आहेत. तर स्पाइस जेट आणि गोएअरचा प्रत्येकी एक-एक कर्मचारी आहे. त्यांच्यावर आता कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांची मद्यपान चाचणी घेण्यात आली होती. ती पॉझिटीव्ह आढळली आहे. नोव्हेंबरमध्ये पुन्हा दुसरी चाचणी होणार आहे. आता यापुढे आम्ही विमान कर्मचाऱ्यांची नियमित चाचणी करणार आहोत. या चाचणीत दोषी आढळलेले बहुतेक कर्मचारी संवेदनशील विभागात कार्यरत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नागरी विमान वाहतूक संचालनालयाने एअरलाईन्स आणि एअरपोर्ट कर्मचाऱ्यांना सप्टेंबरमध्ये मद्यपान चाचणी करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार विमानतळ, एटीसी कर्मचारी, विमानांची निगराणी राखणारे कर्मचारी, विमान कंपन्यांना सांभाळणारे कर्मचारी आदी सर्वांची मद्य चाचणी ही करण्यात आली होती. यामध्ये 13 कर्मचारी नापास झाले असल्याने त्यांना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
स्पाइसजेट विमान कंपनीच्या दोन पायलटवर काही दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली होती. 13 जून रोजी हैदराबादहून जयपूरला जाणाऱ्या स्पाइस जेटच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून या विमानाच्या दोन पायलटवर चार महिन्यांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच काही दिवसांपूर्वी दिल्लीला येणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानाचे तांत्रिक बिघाडामुळे गोव्यात इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. या विमानात एका मंत्र्यासह अधिकारी आणि 180 प्रवासी होते. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे गोव्यातील डाबोलिम विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यावेळी विमानात गोव्याचे पर्यावरण मंत्री निलेश काब्राल, कृषी संचालक आणि अधिकारी प्रवास करत होते. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.