राजस्थानमध्ये 13 कॅबिनेट, 10 राज्यमंत्री आज घेणार शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 08:17 AM2018-12-24T08:17:49+5:302018-12-24T08:18:18+5:30
राजस्थानमध्ये तीन दिवसांच्या गुऱ्हाळानंतर मंत्रिमंडळावर शिक्कामोर्तब झाले.
जयपूर : राजस्थानमध्ये तीन दिवसांच्या गुऱ्हाळानंतर मंत्रिमंडळावर शिक्कामोर्तब झाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याशी चर्चेनंतर 23 मंत्र्यांची नावे ऩिश्चित करण्यात आली आहेत. सोमवारी सकाळी 11.30 वाजता राजभवनात राज्यपाल कल्याण सिंह 13 कॅबिनेट मंत्री आणि 10 राज्यमंत्र्यांना शपथ देणार आहेत.
मंत्रिमंडळावर नजर टाकल्यास 23 पैकी 10 जण पहिल्यांदाच मंत्री बनणार आहेत. तर पहिल्यांदाच निवडून आलेल्या 25 आमदारांपैकी कोणाच्याही गळ्यात मंत्री पदाची माळ पडलेली नाही. 11 महिला आमदारांपैकी केवळ 1 सिकरायच्या आमदार ममता भूपेश या मंत्री होणार आहेत. तर मुस्लिम समुदायातून पोकरणचे आमदार सालेह मोहम्मद यांना संधी देण्य़ात आली आहे. आघाडीतील मित्रपक्ष आरएलडीचे सुभाष गर्ग हे देखील मंत्री होणार आहेत.
जयपूर-भरतपूरमधून सर्वाधिक मंत्री
राजस्थानमधील 14 जिल्ह्यांना एकही मंत्री देण्यात आलेला नाही. तर जयपूर आणि भरतपूरमधून प्रत्येकी 3 मंत्रीपदे देण्याच आलेली आहेत. दौसा-बिकानेरला 2 आणि अन्य जिल्ह्यांमधून प्रत्येकी 1 मंत्री देण्यात आला आहे.