राजस्थानमधील कोटा येथील चंबल फर्टिलायझर्स केमिकल लिमिटेड कंपनीमधून शनिवारी वायू गळती झाली. या वायुगळतीमुळे १३ शालेय मुलांना त्रास होऊन ती बेशुद्ध पडली. यापैकी ७ मुलांना कोटा येथील एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित मुलांवर सीएफसीएल डिस्पेंसरीमध्ये उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोटा-बारां महामार्गावर गढेपान येथे सीएफसीएल केमिकलचा कारखाना आहे. शनिवारी दुपारी येथून अचानक विषारी वायूची गळती झाली. त्यामुळे मुलं बेशुद्ध पडली.
सध्या ही गॅस गळती कशी झाली, याबाबत अधिक माहिती समोर येऊ शकलेली नाही. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली असून, पुढील तपास केला जात आहे. या तपासानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल.
दरम्यान, गॅस गळतीची माहिती मिळताच स्थानिक लोक मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले. तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली. तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक लोक आक्रमक झाल्याने. त्यांची अधिकाऱ्यांसोबत वादावादी झाली. सद्यस्थिती येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच या वायूगळतीमुळे बेशुद्ध झालेल्या मुलांवर उपचार सुरू आहेत.