काेहिमा : नागालॅंडमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांनी केलेल्या गाेळीबारात १३ मजुरांचा मृत्यू झाला. हे मजूर बंडखाेर गटाचे अतिरेकी समजून जवानांनी त्यांच्या वाहनावर गाेळीबार केला. बंडखाेर आणि मजुरांच्या वाहनांना ओळखण्यात जवानांकडून चूक झाल्याने ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे.
आसाम रायफल्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदी घातलेल्या नॅशनल साेशलिस्ट काउंसिल ऑफ नागालॅंड-के या संघटनेच्या युंग ओंग गटाचे अतिरेकी या भागात लपल्याची माहिती लष्कराला मिळाली हाेती. त्यानंतर जवानांनी शाेध माेहीम सुरू केली हाेती. सुरक्षा दलांना एका बाेलेराे कारमधून अतिरेकी येत असल्याची माहिती मिळाली हाेती. मजूरही बाेलेराे पिकअप वाहनातून येत हाेते. अंधारामध्ये गाडी ओळखण्यात चूक झाली. जवानांनी गाडी थांबविण्याचा इशारा दिला. मात्र, गाडी थांबली नाही. त्यामुळे जवानांनी गाेळीबार सुरू केला. जवानांना चूक लक्षात येईपर्यंत ६ जणांचा गाडीतच मृत्यू झाला हाेता. या घटनेतील दोन गंभीर व्यक्तींना उपचारासाठी आसामामध्ये पाठवण्यात आले आहे. तर काही जणांवर नागालँडमध्ये उपचार सुरू आहे.
गृह मंत्रालय काय करत आहे? राहुल गांधी संतप्त
काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हे हृदय पिळवटून टाकणारे आहे. भारत सरकारने यावर खरे उत्तर दिले पाहिजे. आपल्याच भूमीत नागरिक आणि सुरक्षा दलाचे जवान सुरक्षित नसताना गृह मंत्रालय नेमके काय करत आहे, असा संतप्त सवाल राहुल गांधी यांनी ट्विट करून माेदी सरकारला केला आहे.
शांतता राखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहननागालॅंडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांनी शाेक व्यक्त करून घटनेची उच्चस्तरीय चाैकशी करण्याचे आदेश दिले. ही घटना निंदनीय असून शाेकाकुल कुटुंबीयांप्रती मी सहवेदना व्यक्त करताे. सर्व वर्गांनी शांतता राखावी, असे आवाहनही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले.
सर्वांना न्याय मिळाला पाहिजे - बॅनर्जीपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. ट्विटरद्वारे कुटुंबीयांप्रति शाेक संवेदना व्यक्त करताना त्या म्हणाल्या, की जखमी लवकर बरे हाेवाेत ही मी प्रार्थना करते. या घटनेची सखाेल चाैकशी झाली पाहिजे. तसेच सर्व पीडितांना न्याय मिळेल, हे आपण सुनिश्चित करायला हवे.
नागपूरचे संदीप तामगाडगे करणार तपास नागालँडमधील या घटनेनंतर चौकशीसाठी सैन्याने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. नागालँड सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. एसआयटीचे नेतृत्व नागालँडचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संदीप तामगाडगे हे करीत असून ते महाराष्ट्रातील नागपूरचे मूळ रहिवासी आहेत. लोकमतशी बोलताना ते म्हणाले की, या घटनेनंतर ग्रामस्थांनी सैन्याची तीन वाहने जाळली. कोन्याक युनियन आणि आसाम रायफल्सच्या शिबिरांतील कार्यालयांवर हल्ला केला. या भागात इंटरनेट, एसएमएस बंद करण्यात आले आहे.