लग्नमंडपात पसरली शोककळा; मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 15 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 08:39 AM2024-06-03T08:39:11+5:302024-06-03T08:40:32+5:30
मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात रविवारी ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात चार मुलांसह 13 जणांचा मृत्यू झाला.
मध्य प्रदेशमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात रविवारी ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात चार मुलांसह 13 जणांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री आठच्या सुमारास राजगड येथील पिपलोडी येथे लग्नाच्या वराती दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात एकूण 15 जण जखमी झाले आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने जिल्हा प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितलं की, राजस्थानमधील मोतीपुरा येथून वरात कुलमपूरकडे जात होती. राजस्थानच्या सीमेला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील राजगडमध्ये हा अपघात झाला.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. जिल्हाधिकारी हर्ष दीक्षित, पोलीस अधीक्षक आणि मंत्री नारायण सिंह पनवार घटनास्थळी उपस्थित होते. "आम्ही राजस्थान सरकारच्या संपर्कात आहोत आणि राजस्थान पोलीसही घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींवर राजगडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही गंभीर जखमींना भोपाळला रेफर करण्यात आले आहे" असं म्हटलं आहे.
Rajasthan CM Bhajanlal Sharma condoles the demise of 13 people from Jhalawar who died in a road accident in Madhya Pradesh.
— ANI (@ANI) June 3, 2024
The CM tweets that senior officials of Rajasthan have been directed to coordinate with officers in Madhya Pradesh and bring the bodies of the deceased to… https://t.co/HVgWACmsO2pic.twitter.com/wuJYHbamlN
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावर शोक व्यक्त केला आणि आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दु:खद आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत ,मी त्या कुटुंबांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करते. जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करते."
मध्य प्रदेशातील सतना येथे राष्ट्रीय महामार्गावर एक अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. सतना येथे दुभाजकाला धडकून कार उलटली. कारमध्ये 5 जण होते, त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. कारमधील लोक वाढदिवस साजरा करण्यासाठी रेवा येथे जात होते, मात्र त्यांच्या कारला रामपूर बघेलानजवळ अपघात झाला.