लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जगातील एक टक्का सर्वाधिक श्रीमंत लोक एवढे कार्बन उत्सर्जन करीत आहेत, की ते १३ लाख लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरू शकते, असा निष्कर्ष लाभनिरपेक्ष समूह ‘ऑक्सफॅम’ने जारी केलेल्या एका अहवालात काढण्यात आला आहे. जागतिक कार्बन उत्सर्जन आणि पर्यावरण यासंबंधीचा हा अहवाल असून, ‘पर्यावरण समानता : ९९ टक्क्यांसाठी एक ग्रह’ असे त्याचे नाव आहे.
अहवालात म्हटले आहे की, जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांचे कार्बन उत्सर्जन दोन तृतीयांश लोकसंख्येच्या म्हणजेच ५ अब्ज लोकांच्या उत्सर्जनाएवढे आहे. ‘स्टॉकहोम एन्व्हायर्न्मेंट इन्स्टिट्यूट’च्या संशोधनावर आधारित या अहवालात म्हटले आहे की, श्रीमंत लोक प्रचंड प्रमाणात संसाधनांचा वापर करतात. त्यामुळे त्यांचे कार्बन उत्सर्जन अन्य लोकांच्या कार्बन उत्सजर्नाच्या तुलनेत प्रचंड अधिक आहे.