चंदिगड : पंजाबच्या तीन जिल्ह्यांत विषारी दारू पिऊन गेल्या दोन दिवसांत दगावलेल्या लोकांची संख्या शनिवारी ८६ वर पोहोचली असताना मुख्यमंत्री कॅ. अमरेंद्र सिंग यांनी दारुबंदी विभागातील सात व दोन उपअधीक्षक आणि चार ठाणेप्रमुखांसह पोलीस दलातील सहा, अशा एकूण १३ अधिकाऱ्यांना निलंबित करून याप्रकरणी दंडाधिकारीय चौकशी जाहीर केली.
पोलीस आणि दारुबंदी विभागाच्या हलगर्जीपणामुळे झालेले हे मृत्यू ही राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. लोकांना अशा प्रकारे विष पाजून कोणीही सुटू शकणार नाही. पंजाबच्या प्रत्येक नागरिकाचा जीव बहुमूल्य असून काही मूठभर लोकांच्या हव्यासाने असे हकनाक बळी जाऊ दिले जाणार नाहीत. जो कोणी दोषी असतील, अशा कोणाचीही खैर केली जाणार नाही, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मृताच्या कुटुंबास दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदानही जाहीर केले. सर्वाधिक ६३ मृत्यू तरणतारण जिल्ह्यात तर अमृतसर (ग्रामीण) व गुरदासपूरमध्ये (बटाला) अनुक्रमे १२ व ११ लोकांना विषारी दारुमुळे प्राण गमवले आहेत. (वृत्तसंस्था)