ऑनलाइन लोकमत -
कोल्लम, दि, १२ - केरळच्या प्रसिद्ध पुत्तिंगल देवी मंदिरातील आगीप्रकरणी पोलिसांनी 13 जणांवर अटकेची कारवाई केली आहे. यामध्ये व्यवस्थापन समितीच्या सात सदस्यांचादेखील समावेश आहे. रविवारी पुत्तिंगल देवी मंदिरात फटाक्यांच्या आतीषबाजीमुळे लागलेल्या भीषण आगीत होरपळून ११२ जणांचा मृत्यू झाला होता तर ४०० जण जखमी आहेत.
मंगळवारी सकाळी मंदिर विश्वस्त समितीच्या पाच सदस्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं. तर इतर दोन सदस्यांना पोलिसांनी अटक केली होती. घटनेनंतर हे सर्वजण फरार झाले होते. मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष जयलाल, सचिव कृष्णमुर्ती, शिवप्रसाद, सुरेंद्रन पिल्लई, रवींद्रन पिल्लई यांनी क्राईम ब्रांचसमोर आत्मसमर्पण केलं होतं. सुरेंद्रनाथन पिल्लई आणि मुरुगसेन यांचा पोलिसांनी शोध घेऊन अटक केली होती. एकूण 20 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्यामध्ये मंदिर समितीचे सदस्य आणि आतीषबाजी करणा-या कंत्राटदारांचा समावेश आहे.