इंफाळ : मणिपूरमधील नाेनी जिल्ह्यात एका रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या भीषण भूस्खलनात टेरिटाेरियल आर्मीच्या १३ हून अधिक जवानांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण ढिगाऱ्याखाली दबले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ढिगाऱ्यामुळे इजेई नदीचा प्रवाह अडला आहे. त्यामुळे त्याआधीचा भाग जलमय हाेण्याची शक्यता आहे.प्राप्त माहितीनुसार, तुपुल रेल्वे स्थानकाजवळ काम सुरू हाेते. जवळच १०७ टेरिटाेरियल आर्मीचे शिबिर हाेते. बुधवारी रात्री उशिरा भूस्खलनामुळे माेठी दरड या शिबिरावरच काेसळली. त्यामुळे अनेक जवान ढिगाऱ्याखाली अडकले. आतापर्यंत १३ जणांचे मृतदेह काढले आहेत. आणखी किमान ४० जण दबलेले असल्याची शक्यता आहे. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी घटनेनंतर एक आपात्कालीन बैठक बाेलावली. डाॅक्टरांचे एक पथक तातडीने घटनास्थळी पाठविण्यात आले. खराब वातावरणामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे लष्कराचीही मदत घेण्यात येतआहे. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बीरेन सिंह यांच्यासह रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संवाद साधून बचाव कार्याची माहिती घेतली. गेल्या काही दिवसांपासून ईशान्य भारतात प्रचंड पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन व दरडी काेसळण्याच्या घटना घडत आहेत.
नदीचा प्रवाह अडलाढिगाऱ्यामुळे इजाई नदीचा प्रवाह अडला आहे. त्यामुळे तेथे बंधाऱ्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.हा बंधारा फुटल्यास नदीपात्राच्या आजुबाजूच्या गावांमध्ये भीषण पूर येऊ शकताे. त्यामुळे प्रशासनाने ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम हाती घेतले आहे.